Nagpur Politics : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू करण्याची घोषणा झाली, तेव्हापासूनच ही योजना तुफान चर्चेत आहे. शनिवारी (ता. 31 ऑगस्ट) या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम उपराजधानी नागपुरात झाला. कार्यक्रमाला गर्दी चांगली जमली होती. ते पाहून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चांगलेच सुखावले.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना टप्पा – 2’ सुरू असतानाच दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ही योजना व सिधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून सरकारला आडव्या हाताने घेतले. सरकार नागपुरात असताना वडेट्टीवारांनी टिका करण्याची संधी सोडली नाही.
रविवारी (ता. 1) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या टिकांना प्रत्युत्तर दिले. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना दोन वर्षांपूर्वी जनतेने गेटआऊट करून घरी बसवले आहे. नाव शिवाजी महाराजांचे घ्यायचे आणि काम अफजलखान आणि शाईस्तेखानासारखे करायचे. शिवरायांचे नाव घेऊन भाजपसोबत निवडून आले आणि सत्ता स्थापन केली भलत्यांसोबतच. ही कसली आली शिवरायांची भक्ती, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
Chandrashekhar Bawankule : काल रामगिरीवर काय ठरलं, बावनकुळेंनी सर्वच सांगितलं !
महाराजांवरून राजकारण
राजकोटवरील घटनेबाबत मुख्यमंत्री म्हणाले, सिंधुदुर्गातील राजकोट येथे घडलेली घटना सर्वांसाठीच वेदनादायी आहे. याबाबतीत मी स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्री आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर माफी मागितली आहे. या घटनेचे राजकारण करणे दुर्दैवी आहे. तरीही विरोधक राजकारण करत आहेत. कारण त्यांच्याकडे दुसरा कुठला मुद्दा नाहीये. पण असले घाणेरडे राजकारण करून त्यांचे इप्सित साध्य होणार नाही.
लोकसभा निवडणुकीच्याच्या पूर्वी महाविकास आघाडीचे नेते दंगलीची भाषा करत होते. त्यांना महाराष्ट्र शांत नको आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ, संयमी आहे. विरोधकांना पराभव दिसतो आहे. लोकसभेत खोटं नरेटीव्ह पसरवून त्यांनी मतं मिळवली. पण लोक एकदा फसतात, नेहमी नेहमी फसत नाहीत. यावेळी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जनतेला फसवू शकणार नाही. कारण लाडक्या बहीणी आमच्यासोबत आहेत.
योजना बंद करण्याचा हेतू
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची धास्ती विरोधकांनी घेतली आहे. म्हणून त्यांचे मित्र योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. पण त्यांना त्यात यश मिळणार नाही. आमच्या लाडक्या बहीणी त्यांना जोडे मारल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांच्या काळात तरी महिला सुरक्षित होत्या का? नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकलं. कंगणा राणावत यांचं घर तोडलं. महिलांवर अन्याय करणारेच हेच लोक आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला.