Nana Patole : बंटी शेळकेंचा आरोप मी ऐकला नाही. ते काय बोलले याची माहिती घेऊ. बंटी शेळकेंचा उद्रेक का झाला. अशी भाषा ते का वापरत आहेत, यासंदर्भात आम्ही हाय कमांडच्या लक्षात ही बाब आणून देऊ. येवढ्या उद्वेगाने शेळके बोलले, तर त्याची कारणं शोधली पाहिजे. एक व्यक्ती दोन वेळा विधानसभा निवडणूक लढतो आणि दोन्ही वेळा थोड्याच फरकाने पडतो. त्यामुळे त्याच्या भावना कुठे दुखावल्या गेल्या आहेत. याची माहिती नक्कीच घेतली जाईल, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
अधिकार नाही.
आज (29 नोव्हेंबर) नागपुरात विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, निवडणुकीत जय पराजय होत असतो. राजकारणात संयम महत्वाचा असतो. प्रत्येकाने संयम ठेऊन वागले पाहिजे आज आपण 16 आहोत, भविष्यात 160 कसे होऊ, यासाठी काम करणे गरजेचे आहे. उमेदवारी राहुल गांधी आणि काँग्रेस हाय कमांड देत असतं. आम्हालाही तिकीट राहुल गांधीं, मल्लिकार्जून खरगे आणि सोनिया गांधी यांनीच दिली. राज्याच्या नेतृत्वाला फक्त शिफारस करण्याचा अधिकार आहे. तिकीट देण्याचा अधिकार नाही.
बंटी शेळकेंना युवक काँग्रेसच्या कोट्यातून तिकीट मिळाली. शेळके हा लढवय्या कार्यकर्ता आहे. संघाच्या गडात लढतो आहे. निवडणुकीमध्ये शेळकेंना मदत कमी पडली असेल. त्यामुळे त्यांनी अशी भाषा वापरली असावी. परंतु हे योग्य आहे, असे मला वाटत नाही, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये ‘नाना पटोले हटाव’ मोहिम सुरू झाली आहे का, असे विचारले असता, मोहीम असेलही तरी आम्ही त्या मोहिमेमध्ये नाही, असे ते म्हणाले.
पक्षामध्ये कुणीही अशी मोहिम सुरू केली असेल. पण ही मोहिम राबवण्याची काहीही गरज नाही. माणसाच्या हातून काही चुका होत असतात. त्या हाय कमांडच्या कानावर घातल्या जातील. पण असल्या कुठल्याही मोहिमेचा मी भागीदार नाही. पण येवढा मोठा पराजय राज्यात झाला. त्यामुळे त्याची कारणमिमांसा आणि मंथन होण्याची आवश्यकता आहे. केवळ बैठका घेऊन काहीही निष्पन्न होणार नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
पराभूत
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या पराभवाला तेच जबाबदार असल्याचे शेळके यांनी म्हटले आहे. ‘नाना पटोले आरएसएसचा दलाल’, अशा शब्दांत त्यांनी पटोलेंवल हल्लाबोल केला आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. शेळकेंच्या आरोपानंतर ‘नाना पटोले हटाव’ मोहिमेला बळ मिळाल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात दबक्या आवाजात सुरू आहे. शेळके प्रकरणात हाय कमांड काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.