Mahayuti : विधानसभेच्या निवडणुकीत कामठी विधानसभा मतदारसंघातून बावनकुळे विजयी झाले. तर मध्य नागपूर मतदारसंघातून प्रवीण दटके यांनी बाजी मारली. या दोन्ही जागा विधानपरिषदेच्या होत्या. आता या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी ज्या नाराजांना शांत बसवले होते, त्यांना परिषदेचे वेध लागले आहेत. काही नेते तर फडणवीसांवर विश्वास ठेवून बाशिंग देखील बांधून बसले आहेत.
भाजपात प्रवेश
चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दटके यांच्या जागेवर वर्णी लावण्यासाठी नेत्यांनी फडणविसांना साकडे घालायला सुरुवात केली आहे. यामध्ये उमरेडचे राजू पारवे, तर नागपुरातून अविनाश ठाकरे, संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी या चौघांची नावे आघाडीवर आहेत. राजू पारवे यांचा काँग्रेसमध्ये सुखाचा संसार सुरू होता. त्यांनी लोकसभा लढण्यासाठी काँग्रेसचा राजीनामा दिला. भाजपच्या सांगण्यावरून शिवसेनेत प्रवेश घेतला. पण ते पराभूत झाले. विधानसभेत काहीतरी मिळेल या आशेवर होते. पण सुधीर पारवेंना उमरेडचे तिकीट मिळाले. राजू पारवेंनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. फडणवीस यांनी समजूत काढली आणि राजू पारवेंचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला. आता त्यांना परिषदेची आस लागलेली आहे.
अविनाश ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील नेते म्हणून ओळखले जातात. पण त्यांच्या हाती एवढ्या वर्षांमध्ये काहीच आले नाही. त्यांच्याकडे काटोलचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. अविनाश ठाकरे यांना निवडणूक लढायची होती. त्यासाठी काटोल किंवा सावनेरचाच पर्याय होता. पण या दोन्ही जागांसाठी आधीपासून खूप स्पर्धा होती. अखेर प्रभारी म्हणून त्यांनी काटोल जिंकण्यात मोठे योगदान दिले. त्याचे बक्षीस म्हणून आपल्याला परिषदेवर जाण्याची संधी मिळेल असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे.
माजी महापौर संदीप जोशी यांना देवेंद्र फडणवीसांचा राईट हँड म्हटले जाते. फडणवीसांच्या देवगिरीवर जनता दरबार भरवण्यापासून त्याचा पाठपुरावा करण्यापर्यंत जबाबदारी त्यांच्याकडेच आहे. मात्र, पश्चिम नागपुरातून लढण्याची त्यांची इच्छा अर्धवट होती. त्यातच दक्षिणच्या सुधाकर कोहळेंना पश्चिममधून लढविण्यासही त्यांचा विरोध होता. त्यांनी निवडणुकीत काम केले, पण परिषदेवर जाण्याचा त्यांचा प्रयत्न थांबलेला नाही. 2020 मध्ये पदवीधर निवडणुकीत संदीप जोशी यांना संधी मिळाली होती. मात्र अभिजित वंजारी यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता परिषदेत थेट प्रवेशाची अपेक्षा त्यांना असू शकते.
इच्छा राहिली
माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनाही पश्चिम नागपुरातून लढायचे होते. दोन वर्षांपासून पूर्ण तयारी केली होती. पण ऐनवेळी सुधाकर कोहळेंना मैदानात उतरवण्यात आले. त्यावर तिवारी यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. फेसबुकवर ‘चपाती चोर’ असा उल्लेखही एका नेत्याचा केला होता. पण त्यांची समजूत घालण्यासाठी फडणवीस मैदानात आले. तिवारी शांत बसले, पण कोणत्या आशेवर, हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे परिषदेवर जाण्याच्या शर्यतीत त्यांचेही नाव आहे.