Assembly Election : उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी पक्ष फोडले गेल्यामुळे रडणं सुरू केलं आहे. या गोष्टीचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत झाला. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना याचा फायदा होणार नाही. या रडण्याचा फायदा होणार असल्याचे महाविकास आघाडीला वाटत आहे. पण तसे होणार नाही. निवडणूक आयोगाने हेलिकॉप्टरमधील बॅग तपासण्याचे काम केले. असे असताना विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली आहे. बँग तपासण्याचे काम सरकार करीत नाही, असं भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेमकुमार शुक्ला म्हणाले. नागपुरात त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
रडण्याचा नवीन प्रकार पवार आणि ठाकरे यांनी सुरू केला आहे. षडयंत्र रचून या गोष्टीचाही फायदा उद्धव ठाकरे उचलत आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी बॅग तपासतात. उद्धव ठाकरे चक्क व्हिडीओ बनवतात. सोशल मीडियावर पोस्ट करतात. हा मुद्दा जाणीवपूर्वक उचलतात. त्यांची बुद्धी एवढीच मर्यादित आहे, असेही प्रेमकुमार शुक्ला म्हणाले.
कार्यक्षमता नाही
शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांत खिचडी घोटाळा केला. कोविड घोटाळा केला. पीपीई किट घोटाळा केला. औषध घोटाळा केला. त्यांनी विकासासाठी काहीही केले नाही, असा आरोप शुक्ला यांनी केला. विकासाच्या नावावर स्वतःचाच विकास केला. आता फक्त महायुतीने विकास केला नाही अशी भाषा ते बोलत आहेत, असं ते म्हणाले.
शुक्ला यांनी महाविकास आघाडीवर ‘व्होटट जिहाद’ सुरू केल्याचा आरोप केला. मालेगावमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली 125 कोटी रुपये जमा केले. ही रक्कम ‘व्होट जिहाद’साठी वापरण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. उलमा बोर्डाच्या 17 अटींवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्या अटी मान्य केल्याचे शुक्ला म्हणाले. 2012 नंतर कारागृहात असलेल्या मुस्लिम आरोपींची सुटका करावी अशी उलमा बोर्डाची मागणी होती.
अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणात कपात त्यांना हवी होती. त्यातील दहा टक्के आरक्षण मुस्लिमांना हवे होते. अशा अनेक मागण्या उलमा बोर्डाने केल्या होत्या. भाजप सरकार अशा प्रकारच्या मागण्यांना कधीही मान्यता देणार नाही, असं शुक्ला यांनी ठामपणे सांगितलं. सध्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ‘व्होट जिहाद’चा मुद्दा उपस्थित केला जात आहे. देशात गेल्या 10 वर्षांपासून मोदी सरकार आहे. कोणत्याही मुस्लिम समाजातील व्यक्तीला नुकसान झालेले नाही. तरीही भाजपवर सातत्यानं आरोप केले जात आहेत, असे शुक्ला म्हणाले.
Amit Shah : त्यांनी कामं केली नाहीत, अन् आता बकरे कापत सुटले आहेत !
फसवे आरोप
विरोधक फसवे आरोप करण्यात माहीर आहेत. 2024 मधील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मराठा, दलित आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन महायुतीला मतदान केलं. त्याचा परिणाम असा झाला की, भाजपचा दारुण पराभव झाला. या पराभवातून धडा घेत भाजपनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘लॅन्ड जिहाद’ आणि ‘व्होट जिहाद’चा मुद्दा उपस्थित केला. दहशतवाद, लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद आणि व्होट जिहादनंतर आता ‘आरक्षण जिहाद’ सुरू करण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकार असे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही, असं शुक्ला म्हणाले.