Akola District News : शेतकऱ्यांची मुलं ही आर्मीमध्ये, समाजसेवा, देशसेवा करणाऱ्या नोकऱ्यांमध्ये आहेत. मात्र कोणत्याही मोठ्या उद्योगपत्याचा किंवा पुढाऱ्याचा मुलगा आर्मीमध्ये किंवा समाजसेवेच्या नोकरीत नाही आणि जाणारही नाही, असा टोला नामवंत कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी लगावला.
उद्योगपतींना टोला
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे आयोजित कीर्तनात त्यांनी पुढारी आणि उद्योगपतींना टोले लगावले. कीर्तनातून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा विविध विषयांवर परखडपणे मतं मांडणारे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अकोल्यातही राजकीय नेत्यांवर सडकून प्रहार केला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्य फक्त शेतकऱ्यांच्याच मुलांनी टिकवल्याचा घणाघातही इंदुरीकर महाराजांनी केला.
जिथं जिथं संकटाच्या नोकऱ्या आहेत तिथं शेतकऱ्यांची मुलं आहेत. मोठ्या लोकांची नाहीत, ते फक्त आपल्याला म्हणतात विकासाच्या दृष्टीने भरीव कामे करायची आहेत. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर परखडपणे भाष्य केले. ते म्हणाले, मोबाईलने समाजाचं वाटोळं केलं आहे. गावातील पुढाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस तरी शाळेला भेट द्यायला पाहिजे. पण ते देत नाहीत. राज्यातील शाळांमध्ये मोबाईल बंदी करण्याची मागणी कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराजांनी केली.
Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणाले, आता काय स्टॅम्प पेपर वर लिहून देऊ !
शिक्षणावर थेट परिणाम
शाळेत शिक्षकांच्या मोबाईलच्या वापरामुळे शाळांमधील मुलांच्या शिक्षणावर थेट परिणाम होत असल्याचा दावा इंदुरीकर महाराज यांनी केला. त्यामुळे शाळेच्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या वेळेत शाळेत मोबाईल वापरावर बंदी करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. अकोल्यात कीर्तनात त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं आहे. पुढाऱ्यांचा प्रचार केला तर कोणी देणार नाही, बीएससी, एमएससी झालेली मुलं 10 हजार रुपये महिन्याने आहेत. काय होतं 10 हजारांत असा सवालही इंदुरीकर महाराजांनी केला आहे.
युज अँड थ्रो
आम्ही तुमचा प्रचार केला तर तुम्ही आमचा विचार करायचा. शिक्षणात शिकलेल्या लोकांचा ह्या लोकांनी युज अँड थ्रो असा वापर केल्याचा आरोपही इंदुरीकर महाराजांनी केला आहे. स्वतःबद्दल सांगत ते पुढं म्हणाले, 96 कुळी रक्त आहे म्हणून वाकायची सवय नाही. मला बूट पॉलिश करायची सवय आहे, बूट चाटून जगायची सवय नाही. मला सगळं विकायची सवय आहे. पण स्वाभिमान विकायची सवय नाही. या तीन गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवल्याचं त्यांनी सांगितलं. पण तुम्हाला काय? तुम्ही रोजाने सभेत जाणारी माणसं, असा टोलाही इंदुरीकर महाराजांनी लोकांना लगावला. पण इथून पुढं फुगीर व्हा, असा सल्लाही त्यांनी दिला.