Assembly Election : जाती धर्माच्या नावावर निवडणूक लढवणे हे नामर्दाचे लक्षण आहे. धर्म हा निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाही. केंद्र आणि राज्यात असताना धर्म जातीवर राजकारण करणे योग्य नाही. देशात अनेक लोक जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. या परिस्थितीत ‘बटेंगे तो कटेंगे’ असे म्हणणे योग्य नाही. लोक आता जागे झाले आहेत. त्यांना सगळं कळतं. आपण व्यवस्थेविरोधात आवाज उठवत असल्याचं प्रतिपादन प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी मुंबईत केलं. नालासोपारा विधानसभा मतदारसंघात आयोजित एका सभेत ते बोलत होते.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. मुंबईच्या बाजूला असलेल्या नालासोपारा भागात अद्याप पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मुंबईत जगताना अनेकांना त्रास सहन करावा लागतो. दिवसरात्र काम करावे लागते. शेतकरी, शेतमजूर, कामगारांना जगताना अनेक अडचणी सहन कराव्या लागतात. अशात ‘बटेंगे तो कटेंगे’ असा प्रचार केला जात असल्याबद्दल बच्चू कडू यांनी दु:ख व्यक्त केले. भाजपने जाती, धर्मावर नव्हे तर केलेल्या आपल्या विकास कामांवर निवडणूक लढावी, अशी टीका कडू यांनी केली.
Akola West : एका महिलेनं समोर आणला अलीमचंदानी यांचा असाही चेहरा
आत्मा हरवला
निवडणूक आयोग हा लोकशाहीचा आत्मा आहे. परंतु सध्या हा आत्माच हरवला आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीच्या घटनेवरून हे स्पष्ट होते. गरिबांना रेशन दुकानातून स्वस्त कांदा द्याव, अशी मागणी त्यांनी केली. सध्या राज्यातील बहिणींना रक्कम वाटप केली जात आहे. सरकार महागाई वाढवून मिळालेली रक्कम परत देत आहे. धर्म हा निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाही. केंद्र आणि राज्यात सत्ता असताना धर्म-जातिवर राजकारण करणे योग्य नाही, असंही कडू म्हणाले.
जातीय राजकारण
देशात भाजप, काँग्रेस विकासाचे मुद्द्यांवर न बोलता जातीय राजकारण करीत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालीत. शिक्षण, आरोग्य हे मूलभूत प्रश्न कायम आहेत. देशात शाळा, रुग्णालयांची अतिशय वाईट अवस्था आहे. श्रीमंतांसाठी चांगल्या शाळा आहेत. चांगले रुग्णालय आहेत. गरिबांसाठी अतिशय वाईट व्यवस्था आहे. ही आर्थिक विषमता नष्ट झाली पाहिजे. यंदाच्या निवडणुकीत योग चांगला आहे. या योगाचा फायदा आपल्याला होणार आहे. महायुती व महाविकास आघाडीचे सरकार येणार नाही. प्रहारचे सरकार येणार आहे, असेही बच्चू कडू यांनी सांगितले. मतदारांनी योग्य उमेदवार निवडावा असं आवाहनही त्यांनी केलं.