Assembly Election : विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीसाठी धक्कादायक लागलेला आहे. काही नेते अद्यापही या धक्क्यातून सावरलेले दिसत नाहीत. काँग्रेसचे नेते, आमदार आणि पराभूत उमेदवारांची बैठक आज (28 नोव्हेंबर) दुपारी मुंबईतील काँग्रेसच्या टिळक भवनात पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला टार्गेट केले.
नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एक ना अनेक गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. पटोले म्हणाले, मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबरला 5 वाजेपर्यंत 52 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने 65.2 टक्के मतदान झाल्याचा अहवाल प्रसिद् केला. रात्री जे आकडे आयोगाने दिले होते, ते दुसऱ्या दिवशी 21 नोव्हेंबरला सकाळी आणखी वाढले. तसा अहवालही आयोगाने दिला. यामधेय 7.83 टक्के मते वाढलेली दाखवण्यात आली.
76 लाख वाढलेले मतदान आयोगाने दाखवले. यामध्ये काही मतदान केंद्रावर रात्री 11 ते 11.30 वाजेपर्यंत मतदान चालल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. जर रात्री उशिरापर्यंत मतदान चालले. तर सायंकाळी 5.30 – 6.00 वाजेपर्यंत त्या मतदान केंद्रांवर दोन-दोन, चार-चार किलोमीटरच्या रांगा असायला हव्या. कोणकोणत्या बुथवर असे मतदान झाले, त्याचे व्हिडिओज आणि फोटो निवडणूक आयोगाला आम्हाला दाखवावे लागतील, असंही नाना पटोले म्हणाले.
सिंह आला पण गड गेला
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 208 मतांनी निसटता विजय मिळवला. मात्र त्यांच्या गृह जिल्हा भंडाऱ्यात महाविकास आघाडीला साकोली सोडून कोणतीही जागा जिंकता आलेली नाही. या निकालामुळे नाना पटोले यांच्या नेतृत्वावर टीका होऊ लागली आहे. भंडारा जिल्हा हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. मात्र, यंदाच्या निवडणुकीत नाना पटोले यांचा वैयक्तिक विजय वगळता जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.
Maharashtra CM : आज रात्री दिल्लीत ठरणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री !
महायुतीने जिल्ह्यात जोरदार कामगिरी करत आघाडीला नामोहरम केले. भंडाऱ्यातील आणि एकंदरीत महाराष्ट्रातील पराभव चिंताजनक आहे. यावर चिंतन करून पक्ष संघटन मजबूत करण्यावर नाना निश्चितच भर देतील. राजकीय विश्लेषकांच्या मते, नाना पटोले यांच्यावर आता काँग्रेससह महाविकास आघाडीच्या एकत्रित कामगिरीची जबाबदारी आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या जागांवर लक्ष केंद्रित केले होते, मात्र अपेक्षित यश मिळवण्यात ते अपयशी ठरले. आता नाना पटोलेंना काँग्रेसमध्ये आणि एकंदरीतच महाविकास आघाडीत जोश भरावा लागणार आहे.