Assembly Election : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विविध जातींच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. या माध्यमातून जोरदार राजकारण सुरू आहे. यामध्ये आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही पुन्हा एकदा तापला आहे. धनगर समाजाने आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं आहे. आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण देण्याची धनगर समाजाने मागणी केली आहे. तर आदिवासींनी धनगर समाजाला आपल्या कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. खुद्द सत्ताधारी पक्षाचे आमदारच या आरक्षणाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यांनी तर कायदा हातात घ्यायला लावू नका, असा थेट इशाराच सरकारला दिला आहे.
राजकीय वातावरण तापलं
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्याला आदिवासी समाजाकडून कडाडून विरोध होत आहे. आता अजित गटाचे नेते डॉ. किरण लहामटे यांनीही सरकारला या मुद्द्यावरून घरचा आहेर दिला आहे. धनगरांना आरक्षण द्या. पण आदिवासीतून देऊ नका, असं सांगतानाच आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका, असा सज्जड दम किरण लहामटे यांनी दिला आहे. त्यामुळे आता महायुतीतच धनगर आरक्षणावरून बेबनाव असल्याचं दिसत आहे.
आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. ‘आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका. तसं झालं तर उग्र स्वरूपाच आंदोलन केल जाईल,’ असा इशारा त्यांनी दिला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यानंतर सत्तेतील दुसऱ्या आमदाराने आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिला आहे, हे विशेष.
Congress Agitation : यावेळी आमदार गायकवाडांना भारी पडणार आगाऊपणा !
मुंबईचा पाणीपुरवठा बंद करू
धनगरांना आदिवासींमधून आरक्षण देण्याचा सरकार विचार का करत आहे? किंवा काही संघटनांना का वाटतंय आदिवासी समाजातून आरक्षण मिळावं? आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका. तसं झालं तर मोठं आंदोलन करू. मुंबईला जो पाणीपुरवठा होतो तो आदिवासी भागातून होतो. त्यामुळे आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावू नका. धरणांसाठी जमिनी आम्ही दिल्या. शोषण आमचं झालंय. घटनेने आम्हाला जे आरक्षण दिलंय त्यावर जर इतरांचा डोळा असेल तर ते चालणार नाही. सरकारने पुन्हा एकदा डोकं ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावा, असंही लहामटे म्हणाले.