महाराष्ट्र

Assembly Elections : बहुतांश मतदारसंघात आजी-माजी आमदार भिडणार 

Buldhana : माजी मंत्र्यांचीही प्रतिष्ठा पणाला

बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी विद्यमान आमदारांच्या विरोधामध्ये माजी आमदार रिंगणामध्ये उतरल्यामुळे तेथे रंगतदार लढती बघावयास मिळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी झालेली बंडखोरी तर काही ठिकाणी अन्य पक्षाचे उमेदवार मैदानामध्ये असल्यामुळे तेथे चौरंगी, पंचरंगी लढती बघावयास मिळणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सातपैकी चार मतदारसंघांमध्येही अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आहे. सर्वच मतदारसंघात उमेदवारांची संख्या जास्त असली तरी दोन प्रमुख उमेदवार आमने सामने असतील. तर अन्य तीन मतदारसंघांमध्ये तिरंगी अथवा चौरंगी लढत बघायला मिळेल. अपक्ष उमेद‌वारही मोठ्या संख्येने यावेळी रिंगणामध्ये उतरलेले असल्याने त्यांच्यामुळे समीकरणे बदलणार का, हा प्रश्न आहे.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागील अडीच वर्षात येथील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून मोठमोठे दावे, आरोप-प्रत्यारोप, शिवीगाळ आणि खालच्या स्तरावरील भाषेमुळे हा मतदारसंघ चर्चेत राहिला. आमदार संजय गायकवाड यांनी आतापर्यंत अनेक समाजाच्या विरोधात वादग्रस्त विधान केले आहे. यामध्ये वारकरी समाज, बौद्ध समाज मुस्लिम समाज आणि उरलेला बुलढाण्यातील अधिकारी व कर्मचारी वर्ग देखील त्यांनी सोडला नाही. या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा म्हणून विरोधकांनी हाच विषय समोर ठेवला आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या प्रदेश सचिवांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश घेऊन तिकीट मिळवले. यामुळे ही लढत रंगतदार होणार असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहेत.

मलकापूर विधानसभा मतदारसंघ 

हा मतदारसंघ तसा भाजपाचा पारंपारिक मतदारसंघ. मात्र याला फाटा देत 2019 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे राजेश इकडे यांनी विजय मिळवून या ठिकाणी आपली सत्ता काबीज केली यामुळे सतत पाच वर्ष आमदार राहिलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते चैनसुख संचेती हे यावेळेस पुन्हा रिंगणात आहेत त्यांची लढत विद्यमान आमदार राजेश इकडे यांच्याशी होणार आहे.

खामगाव विधानसभा मतदारसंघ

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हातून निसटलेला हा गड पुन्हा काबीज करण्यासाठी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा हे एक वेळ पुन्हा भाजपाचे आमदार आकाश फुंडकर यांच्यासमोर आहे. या लढतीकडेही संपूर्ण जिल्हा वाश्यांचे लक्ष आहे.

Buldhana : सिंदखेड राजामध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त!

जळगाव जामोद मतदारसंघ 

मागील वीस वर्षांपासून आपली सत्ता गाजवणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार डॉ संजय कुटे हे पुन्हा भाजपाचा गड साबूत करण्यासाठी मैदानात आहेत. महाविकास आघाडीकडून स्वाती वाकेकर यांच्याशी त्यांचा पुन्हा सामना होणार आहे. काँग्रेस पक्षामध्ये असलेले गट-तट आणि इतरांना तिकीट मिळाले की त्यांना पाडण्यासाठी पक्षातूनच केलेले प्रयत्न, आणि कोणालाही मोठे होऊ न देण्याची वृत्तीमुळे या मतदारसंघात कधीही काँग्रेस पक्षाला यश मिळू शकत नाही. यामुळे आमदार कुटे हे पुन्हा निर्विवादपणे 23 नोव्हेंबर रोजी विजय जल्लोष साजरा करणार आहेत.

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ

हा मतदारसंघ तसा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचाच पंचवीस वर्षे आमदार राहिलेले राजेंद्र शिंगणे पुन्हा मैदानात आहेत. मात्र मैदानात येण्यापूर्वी महिनाभर त्यांनी चालवलेला पोरखळ खेळ राज्यभर चर्चेत राहिला. दादांच्या गटात राहून शरद पवारांच्या पक्षाकडे डोहाळे लावणारे शिंगणे मात्र वेळोवेळी नाकारत होते. शेवटी लपवलेले सत्य बाहेर आले आणि त्यांनी पुन्हा शरद पवारांची कास धरली. या ठिकाणी माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्याशी त्यांची लढत होणार आहे.

मेहकर विधानसभा मतदारसंघ

शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर हे चौथ्यांदा रिंगणात आहेत. शिवसेनेचे नेते केंद्रीय राज्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव यांचा होमटाऊन असलेल्या या मतदारसंघावर तसा शिवसेनेचा ताबा आहे. मात्र गद्दार तडीपार हा नारा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी बहाल केली आहे. त्यामुळे ही लढतही पाहण्यासारखी होईल.

चिखली विधानसभा मतदारसंघ 

दोन वेळा आमदार म्हणून राहिलेले काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना 2019 च्या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाच्या सौ श्वेता महाले यांनी त्यांचा दारूण पराभव केला. ही लढत चिखली मतदारसंघात पुन्हा होणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!