Curfew Deployed : मणिपूरमध्ये पुन्हा भीषण रक्तपात सुरू झाला आहे. संतप्त जमावानं मुख्यमंत्र्यांसह दहा आमदारांच्या घरांवर हल्ला केला. यासंदर्भात मणिपूर सरकारनं पंतप्रधान कार्यालयाला कळविले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून मेसेज येताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नागपुरातून दिल्लीत दाखल झाले आहेत. मणिपूरमधील सात जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पाच जिल्ह्यात अत्यंत कठोर पद्धतीनं संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये तीन महिला आणि तीन मुलांचे मृतदेह आढळल्यानंतर नव्यानं रक्तपात सुरू झाला.
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) प्रमुख अनिश दयाल यांना मणिपूरला पाठविण्यात आले आहे. मणिपूर राज्य सरकारने केंद्राला सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) मागे घेण्यास सांगितले आहे. हिंसाचारामुळे केंद्र सरकारने 14 नोव्हेंबर हा कायदा लागू केला होता. इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, जिरिबाम, कांगपोकपी येथे हा कायदा लागू करण्यात आला होता. याशिवाय बिष्णुपूर जिल्ह्यांतील सेकमाई, लामसांग, लमलाई, जिरिबाम, लीमाखोंग आणि मोइरांग पोलिस स्टेशन परिसरातही एएफएसपीए लागू करण्यात आला आहे.
गंभीर परिस्थिती
जिरीबाम येथील बराक नदीच्या पात्रातून दोन महिला आणि एका मुलाचे मृतदेह सापडले. त्यानंतर पुन्हा हिंसेला सुरुवात झाली. काही मंत्र्यांसह भाजपच्या 19 आमदारांनी पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) पत्र लिहून बिरेन सिंग यांना हटवण्याची मागणी केली आहे. त्यामुळं मणिपूरमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. राजकीय अस्थिरताही पसरली आहे. परिस्थिती आणखी बिघडल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे.
अपहरण केल्याचा आरोप
जिरीबाम येथुन कुकी अतिरेक्यांनी महिला आणि मुलांचं अपहरण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजीच सुरक्षा दलांनी 10 बंदूकधारी अतिरेक्यांना ठार केले होते. मात्र अपहरण झालेल्यांचा मृत्यू झाल्यानंतर तणाव निर्माण झाला. सध्या इम्फाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिष्णुपूर, थौबल, कक्चिंग, कांगपोकपी आणि चुराचंदपूर येथे प्रचंड तणाव आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजपला मणिपूर जाळायचे आहे. द्वेषाचे आणि विभाजनाचे राजकारण भाजप करीत आहे. 7 नोव्हेंबरपासून राज्यात 17 जणांना जीव गमवावा लागला आहे, असे खर्गे म्हणाले. राहुल गांधी यांनीही ट्विट करून मणिपूरमधील अलीकडील हिंसक संघर्ष अस्वस्थ करणारी असल्याचं नमूद केलं.