Kalyan Election News : कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रतिष्ठेची लढत आहे. येथे ठाकरे गटातून वैशाली दरेकर तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक लढवत आहेत. यामुळे दोन्ही बाजूने जोरदार संघर्ष होताना दिसत आहे. त्यातच मतदार यादी मधून हजारो मतदारांची नावे नाहीशी दिसली. ज्या मतदारांनी मागे दोन-तीन वेळा मतदान केले त्या मतदारांचे देखील नाव निवडणुकीच्या यादीतून गायब आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर कल्याण मतदारसंघात काही भागात ईव्हीएम बंद पडल्याची घटना घडली.
नाव शोधले पण मिळे ना ..
प्रभागातील माजी नगरसेवकांकडे मतदारांनी तक्रार करण्यास सुरुवात करताच अनेक ठिकाणी माजी नगरसेवक, नगरसेविका बुथवर उतरून नाव शोधण्याचे काम करू लागले. परंतु नाव सापडतच नव्हते. प्रशासनाचा भोंगळ कारभार असल्याने त्याचा फटका मतदारांना, पर्यायाने उमेदवारांना बसला असल्याचे मत माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी व्यक्त केले.
सकाळ पासून मतदार घराबाहेर
डोंबिवली विधानसभा क्षेत्रात सकाळ पासूनच लोकसभा मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली होती. उन्हाचा त्रास नको म्हणून सकाळीच अनेकांनी घराबाहेर पडत मतदान केंद्र गाठण्यास सुरवात केली.
मतदान केंद्राच्या जवळील बुथवर जाऊन मतदार यादीत नागरिक आपले नाव शोधू लागले. मात्र सकाळी 8 पासून ते 11 वाजत आले तरी नाव सापडत नसल्याने नागरिक हैराण झाले. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाल, पिसवली, नेतिवली या भागात बहुतांश मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याने या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
Dhule Constituency : एकीकडे मतदान अन् दुसरीकडे भाजपचा प्रचार
प्रतिष्ठेची लढत
कल्य़ाण लोकसभा मतदारसंघात प्रतिष्ठेची लढत आहे. एका बाजूला मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर. दरेकर श्रीकांत शिंदे यांना जड जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, आता हे 4 जून रोजी समोर येईल. यादीत नाव नसल्याचा फटका उमेदवारांना बसणार यात शंका नाही.