संपादकीय

Lok Sabha Election : जनतेचे उमेदवार राहायचे सुदाम काका

Sudamkaka Deshmukh : राजकारणात तेव्हा मतभेद होते मनभेद नव्हते

Politics at its best : अमरावती लोकसभा मतदारसंघातच नाही. तर, तीस चाळीस वर्षापूर्वीचे राजकारण ज्यांना माहिती आहे त्यांना निवडणुकीच्या धामधुमीत माजी खासदार कै.सुदामकाका देशमुख यांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. जनतेच्या प्रेमाच्या शिदोरीवर काका निवडून यायचे. 

कालाय तस्मै न म:

सध्याच्या घडीचे आणि तेव्हाचे राजकारण यात खूप फरक झाला आहे. पूर्वी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पक्षीय, वैचारिक मतभेद होते. परंतु सार्वजनिक जीवनात वावरतांना कुठेही मनभेद नव्हते. वैयक्तिक आरोप प्रत्यारोपाला जागा नव्हती. एकमेकांविषयी आदर होता. जनतेनेही अशा लोकप्रतिनिधींवर जीवापाड प्रेम केले, आत्मियतेचं नातं जपलं. त्यातील एक होते. सुदामकाका देशमुख. कर्मयोगी गाडगेबाबांचा विचार ही माणसे जगली.

जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य

अमरावती लोकसभा मतदारसंघात जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य करणारे कर्तव्यतत्पर, ध्येयनिष्ठ लोकप्रतिनिधी म्हणून सुदाम काका देशमुख यांनी अमिट छाप पाडली. 1989 च्या निवडणुकीत सुदाम काका यांनी काँग्रेसच्या उषाताई चौधरी यांचा पराभव केला होता. जनतेचे प्रचंड प्रेम सुदाम काका यांच्या पाठीशी होते. तोच त्यांचा आधार होता.

सुदाम काका निवडून यावेत ही जनतेचीच इच्छा असायची. लोक त्यांच्या साठी तन मन धनाने कामे करायचे. निवडणुकीत पैशाचा बोलबाला तितका नव्हता. राजकारणाचे व्यवसायीकरण झालेले नव्हते. माणुसकी जपली जायची. व्यापारी तसेच समाजातील सर्व क्षेत्रातील लोक काकांसाठी परिश्रम करायचे.

कष्टकऱ्यांसाठी कळवळा

जनसामान्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती. आमदार असताना गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न लावून धरायचे. जनतेनेही त्यांचे विषयी मनात कृतज्ञभाव ठेवला. साधी राहणी उच्च विचारसरणी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुदाम काका. साधा अंगरखा, आत बंडी, धोतर, चप्पल असा पेहराव असायचा. 1989 च्या निवडणुकीत कोणतीही साधने उपलब्ध नसताना स्कूटरवर फिरुन त्यांनी प्रचार केला. वेगळेपण जपले. जनतेच्या मनातील उमेदवार काय असतो हे त्यांनी कृतीतून दाखवले.

काकांचा नागरी सत्कार

सुदाम काकांच्या स्नेहीजनांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करायचे ठरवले. तत्कालीन खासदार प्रतिभाताई पाटील, माजी खासदार रा. सु.गवई, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचा आयोजनात पुढाकार होता. काका तेव्हा कर्करोगाने आजारी होते. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भाई बर्धन यांनी काकांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. तेव्हा उपस्थितांसह काॅम्रेड बर्धन यांना देखील गहिवरून आले. सत्कार समितीने काकांच्या घरी जाऊन त्यांना सन्मानित केले.

Lok Sabha Election : देशावरील संकटे दूर करण्यासाठी आम्हाला बुद्धी, विरोधकांना सुबुद्धी दे

मधुकर भावे यांना पाहून काकांनी पाटीवर लिहिले तुमच्या वृत्तपत्रातून मेळघाटातील कुपोषणाला प्रसिद्धी द्या. त्या अवस्थेतही काकांमधील लोकप्रतिनिधी जागा होता. कुठल्या धाटणीची ती लोकं होती. दुर्दैव म्हणजे कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी काका अनंताच्या प्रवासाला निघून गेले. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. परंतु लोकसभा निवडणुकी दरम्यान सुदाम काकांची, त्यांच्या सारख्या निरलस व्यक्तीमत्वाची आठवण या भागात आल्याशिवाय राहत नाही.

साधन शुचिता हरवली

आज पैशाशिवाय निवडणूक लढवली जात नाही. साधन शुचिता राहिली नाही. वाटेल तसे आरोप केले जातात. सत्ता, संपत्तीच्या गराड्यात राजकारणाची घुसमट होत आहे. कै. सुदाम काका यांना अभिप्रेत असलेले राजकारण कधीच हद्दपार झाले हे दुर्दैवाने म्हणावे लागते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!