Mahayuti : माझ्याकडे सूत्रं आल्यावर मी माझ्या दोन्ही सहकाऱ्यांना सांगितलं की आपण लाडकी बहीण योजना सुरू करू’… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या विधानाने भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण आता निवडणूक जवळ आली आहे. ज्या योजनांनी जनतेला भूरळ पाडली त्यांचे श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. आतापर्यंत श्रेयवादाच्या लढाईत तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि आमदार होते. मात्र आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी यात उडी घेतल्यामुळे वेगळं वळण प्राप्त झालं आहे.
धाराशीव येथे आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. विशेष म्हणजे आतापर्यंत योजनेचे मार्केटिंग महायुतीच्या नावाने होत होते. पण मुख्यमंत्र्यांनी प्रथमच योजनेची संकल्पना त्यांची स्वतःची असल्याचे सांगितले. आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चेकमेट दिला आहे.
लाडकी बहीण योजनेची जोरदार जाहिरातबाजी
महायुती व महाविकास आघाडी मधील सर्व घटक पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. महायुतीने प्रचार करताना लाडकी बहीण योजनेचा पुरेपर प्रचार सुरु केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे लाडकी बहीण योजनेची जोरदार जाहिरातबाजी करत आहेत. मात्र योजनेमुळे महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. लाडकी बहीण नक्की अजित पवारांची, एकनाथ शिंदेंची की देवेंद्र फडणवीसांची असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच या योजनेचे क्रेडिट घेतले आहे.
लाडक्या बहिणीची साथ देणारा हा एकनाथ आहे. यापुढे दरमहा तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार आहेत. ही योजना कोणीही माईचा लाल बंद करू शकत नाही. लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावाला जोडा मारा. सोन्याचा चमचा, पौश्यांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत कळत नाही. माझी आई घर चालवताना कसं मन मारून घर चालवायची हे मी पाहिले आहे. म्हणून मी ही योजना सुरू केली, असं मुख्यमंत्री म्हणाले.
एक बार कमिटमेंट कर दी..
महिलांना एसटी प्रवासात अर्धे तिकीट दिले आणि तोट्यातील एसटी फायद्यात आली. अनेकजण आम्हाला म्हणाले अर्धे तिकीट केल्यास एसटी तोट्यात येईल. पण बहिणीचे आशीर्वाद मिळाले आणि एसटी फायद्यात आली. विरोधक म्हणाले योजनेसाठी पैसे कुठून आणणार? पण यांचे नेते म्हणाले होते खटाखट पैसे देणार. पण आम्ही ते पैसे प्रत्यक्षात दिले. एका सिनेमात डायलॉग आहे की, ‘एक बार जो मैने कमिटमेन्ट कर दी, तो मै अपने आप की भी नही सुनता’. या डायलॉगप्रमाणे महायुती सरकार काम करतं. आम्ही दिलेला शब्द पाळला आहे. पुढेही पाळत राहणार. आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
Ladaki Bahin Yojana : अनिल देशमुख म्हणतात, ‘आम्ही बहिणींना 3 हजार रुपये देऊ!’
लाडक्या बहिणीसाठी तरतूद
सर्व योजनांसाठी आम्ही पैश्यांची तरतूद केली आहे. एकदा बाण धनुष्यातून सुटला तो सुटला. तसा मुख्यमंत्री किंवा तुमच्या भावाने शब्द दिला म्हणजे दिला. या योजना मुळीच बंद होणार नाही. आम्ही बहिणींना दीड हजारावर थांबवणार नाही तर तुम्हाला लखपती दिदी बनवणार आहोत, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी दिला.