Mumbai : ओटीपी देताच पैसे गायब झाले, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून लुटले, ऑनलाईन वस्तू खरेदीमध्ये फसवणूक झाली… यासारख्या घटनांनंतर काय करावे, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. पण आता अश्या ऑनलाईन फ्रॉडवर जरब बसणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने हेल्पलाईन उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमाधून सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
डिजीटल साधनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. मात्र, ऑनलाईन व्यवहारांच्या माहिती अभावी अनेकांची फसवणूक होते. अशा परिस्थितीत सायबर सुरक्षा अधिक भक्कम करणे गरजेचे होते. राज्यात सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता ‘व्हॉट नाऊ’ या संस्थेने 9019115115 ही हेल्पलाईन उपलब्ध करून दिली आहे.
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते या हेल्पलाईनचे अलीकडेच उद्घाटन झाले. यावेळी महाराष्ट्र युवा सायबर सुरक्षा उपक्रमालाही प्रारंभ झाला. यावेळी बृहन्मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक बी. के. सिंग, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, ‘व्हॉट नाऊ’च्या फाऊंडर निती गोयल, निवेदिता श्रेयांस यांची उपस्थिती होती.
सायबर सुरक्षा केंद्राची उभारणी
सायबर गुन्हे व ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकारांमुळे युवकांवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध घालणारी यंत्रणा मजबूत करण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईतील महापे येथे सायबर सुरक्षा केंद्राची उभारणी करण्यात येत आहे, असे सौनिक यांनी सांगितले. ‘व्हॉट नाऊ’ संस्थेने हेल्पलाईन क्रमांक जारी करून सायबर सुरक्षेसंदर्भातील पाऊल टाकले आहे. यासोबतच राज्याच्या पोलीस विभागाची सायबर गुन्ह्यांमध्ये मदतीसाठी 1930 क्रमांकाची हेल्पलाईन सुरू आहे.
न घाबरता पुढे या
ऑनलाईन व्यवहार व वर्तनाबाबत फसवणूक झाल्यास न घाबरता पुढे येवून या हेल्पलाईनवर तक्रार द्यावी. तसेच संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी. शाळा, महाविद्यालय, कार्यालये, रहिवासी संकुलांमध्ये सायबर सुरक्षेसाठी युवकांनी जनजागृती करावी, अशी सूचना त्यांनी केली. महाराष्ट्र सायबर सेलच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या ‘व्हॉट नाऊ’ चळवळीच्या माध्यमातून सायबर सुरक्षा अधिक मजबूत होण्यास हातभार लागेल, असा विश्वासही मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी यावेळी व्यक्त केला.
अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट टाळा
सायबर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मुंबई पोलीस सदैव पाठिशी आहे. मुंबई पोलिस सायबर सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवित आहे. युवकांनी समाजमाध्यमे वापरताना अनोळखी व्यक्तींचे कॉल, फ्रेंड रिक्वेस्ट यांना प्रतिसाद देवू नये. फसवणुकीची घटना घडल्यास आपल्या पालकांना कल्पना द्यावी. तसेच कुठलीही शंका न बाळगता पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन बृहन्मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले.
फसवणूक होऊ शकते, पण…
मोबाईल हे केवळ संपर्काचे साधन राहिलेले नाही. यामध्ये आर्थिक व्यवहारांची सर्व माहिती संकलित असते. त्यामुळे मोबाईल हॅक करून, त्यामधील माहिती चोरून आपली फसवणूक होवू शकते. पण नवीन कायदे लागू झाले असून याबाबत पोलिसांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. हे कायदे पीडितांना नक्कीच न्याय देणारे आहेत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केला.