Zilla Parishad School : सोशल मीडियावर नृत्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे बिनधास्त डान्स करताना दिसतात. शाळा कॉलेजातील मुलांच्या डान्सचे व्हिडियो तर रिल्सच्या माध्यमातून कायम चर्चेत असतात. सध्या बुलढाणा जिल्ह्यातून एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सर्व विद्यार्थी चक्क त्यांच्या शिक्षकासोबत डान्स करताना दिसत आहेत. सरांचा डान्स पाहून तर कुणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
शाळेची गोडी निर्माण करण्यासाठी युक्ती
शाळा सुरु झाल्या की विद्यार्थ्यांवर अभ्यासाचं दडपण येतं. शाळेतील तासिका, होमवर्क आणि शिकवणी यामध्ये विद्यार्थ्यांचं बालपण हरवत चाललं आहे. परंतु, काही शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवणारे शिक्षक असतात. जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील शिक्षकही वेगळी वाट निवडत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आणि शाळेची गोडी निर्माण करतात. याची प्रचिती देणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. कधी शिक्षक विद्यार्थ्यांना तालासुरात कविता शिकवताना दिसतात. तर कधी शिक्षिका मुलांसोबत डान्स करताना दिसतात. आता देखील असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात शिक्षक आणि विद्यार्थी शाळेच्या मैदानात डान्स करताना दिसत आहेत.
पूर्वीच्या शालेय जीवनात आणि आताच्या शालेय जीवनात खूप फरक आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांसोबत बोलायला देखील घाबरायचे. पण हल्लीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांसोबत मैत्रीपूर्ण संबंध बघायला मिळतात. शिवाय सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे शाळेतील शिक्षकदेखील विद्यार्थ्यांसोबत रिल्स बनवताना दिसतात. अशाच बुलढाण्यातील जिल्हापरिषद शाळा सवणा येथे हा उपक्रम राबवला आणि विद्यार्थ्यांसोबतच सर्व शिक्षक देखील थिरकले. व्हिडिओमधील शिक्षक स्टेजवर विद्यार्थ्यांच्या समोर नाचत आहेत. ‘नाच रे मोरा’ गाण्यावर त्यांनी ठेका धरला आहे. त्यांच्या समोर मैदानात विद्यार्थी उभे आहेत. जे वेगवेगळ्या इयत्तेतील दिसत आहेत. या विद्यार्थ्यांनीही शिक्षकांसोबत गाण्यावर ताल धरला आहे. रोज रोजच्या अभ्यासाने विद्यार्थी देखील कंटाळलेले असतात. या विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमुळे एक ऊर्जा मिळते आणि शाळा हवीहवीशी वाटते.
वायरल व्हिडिओ
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाळेच्या मैदानावर मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित आहेत. यावेळी सर्व शिक्षक समोरच्या स्टेजवर उभे असून “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” या गाण्यावर डान्स करत आहे. शिक्षकांबरोबरच विद्यार्थीदेखील उत्साहाने डान्स करताना दिसत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्याही डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.