Buldhana News : “जो राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार”, असं आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. सोमवारी (ता. 16) रात्री उशिरा या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दुसरीकडे ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी त्यापुढे जाऊन थेट आमदार संजय गायकवाडांना एक कोटी रुपयांच्या बक्षिसांचे ऑफर दिले आहे.
धक्कादायक वक्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय गायकवाड यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त करत वादग्रस्त वक्तव्य केलं. “जो राहुल गांधीची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचे बक्षीस देणार”, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत. त्यांच्या वक्तव्यांनंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत.
काल रात्री ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी आपल्या सोशल मिडिया हॅण्डलवरून एक व्हिडीओ ट्विट केला. राहुल गांधींची जीभ छाटायची तर सोडा, त्यांच्या केसाला जरी हात लावून आलात तर 1 कोटी रुपये जमा करून देऊ, असे प्रति आव्हान केदार यांनी व्हिडीओद्वारे दिले आहे. केदार म्हणाले कि, संजय गायकवाड प्रसिद्धीसाठी काही बरळातात. एकनाथ शिंदे यांनी कसे-कसे आमदार पाळले, हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे.
गोळ्या संपल्या काय ते पहिले विचारा त्यांना. आज बरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांना खामगावमध्ये जातीयवाद्यांनी मारलं. ॲट्रॉसिटीची क्रॉस केस करा, त्यावेळेस काय काय तुम्ही दिवे लावले, हे महाराष्ट्राला माहित नाही काय ? दलितांवरती हल्ले होताना तुम्ही क्रॉस केसची भाषा करता आणि त्याची माफी तुम्ही आतापर्यंत मागू शकले नाहीत.
मीडियामध्ये प्रसिद्धीसाठी
कुणीतरी चिठ्ठी दिली लिहून ठेवली म्हणून वाचून दाखवता मीडियामध्ये प्रसिद्धीसाठी. जीभ छाटायची भाषा करताय. ऐऱ्या-गैऱ्याला धमकी देताय का ? जीभ छाटायची सोडा, संजय गायकवाड तुम्ही राहुल गांधीच्या केसाला जरी टच केलं ना तरी हा दीपक केदार तुम्हाला एक कोटी रुपये जमा करून देइल, असे ते म्हणाले.
राजकारणात ट्विस्ट
दीपक केदारांच्या या प्रतिउत्तराने आता बुलढाण्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट आलेले आहे. एकीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सोमवारी रात्री उशिरापर्यंत आमदारावर गुन्हा दाखल करून घेण्यासाठी लढा दिला. त्यामध्ये त्यांना यश आले. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदारांनी आमदार गायकवाड यांना एक कोटीची ऑफर दिली. त्यावर आमदार गायकवाड काय प्रतिक्रिया देतात, हे सायंकाळपर्यंत समोर येणार आहे.