या लेखातील मतं ही लेखकाची आहेत. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असं नाही.
War To Win Mantralay : निवडणुकीनंतर आमच्या सहकार्याशिवाय नवीन सरकार स्थापन होणे अशक्य आहे. या आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी बडनेरा येथील जाहीर सभेत केला. बडनेरा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढणाऱ्या प्रीती संजय बंड यांच्या प्रचार सभेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. बच्चू कडू यांचे वक्तव्य अपक्ष उमेदवारांचे महत्व अधोरेखित करणारे आहे.
उत्स्फूर्त प्रतिसादात ही सभा झाली. आपल्या भाषणात बच्चू कडू यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले उमेदवार रवी राणा यांचेवर खरपूस टीका केली. ही निवडणूक साधी नाही. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा सामना आहे. जनतेचा उदंड प्रतिसाद बघता या निवडणुकीत प्रीती बंड नक्कीच विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रीती बंड या शेतकरी, शेतमजूर तसेच जनसामान्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या वाघीण आहेत. त्यांना व्यापक प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद बघता त्यांना विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
जनसामान्यांचे, तळागाळातील व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यात सत्ताधारी पक्ष अपयशी ठरत आहे. या घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सजक लोकप्रतिनिधी निवडून येणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
जनतेच्या पाठबळावर आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपण निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, अशी भावना प्रीती बंड यांनी बोलून दाखवली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने प्रीती बंड यांना तिकीट नाकारले. आपलं तिकीट का कापलं? यांचं त्यांना अजूनही आश्चर्य वाटतं. त्यांचेऐवजी सुनील खराटे यांना उमेदवारी देण्यात आली
नाराजीतून ‘बंड’
उमेदवारी न मिळाल्यानं प्रीती बंड समर्थकांत नाराजी पसरली. जनतेच्या पाठबळावर आता त्या अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. जनता लोकवर्गणी उभारून उत्स्फूर्तपणे या निवडणुकीत सहभागी झाली आहे. प्रीती बंड यांचे पती शिवसेनेचे निष्ठावंत नेते होते. जनसामान्यांना सहज उपलब्ध होणारा, त्यांना हवी ती मदत करणारा नेता अशी त्यांची ओळख होती. त्यांचा चाहता वर्गही मोठा होता. या पाठबळावर प्रीती बंड निवडणूक लढवित आहेत.
जनतेच्या पाठिंब्यावर सुदाम देशमुख यांनी याआधी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून जिंकली होती. सामान्य जनतेने लोकवर्गणी करून या निवडणुकीत देशमुख यांना प्रतिसाद दिला होता. या निवडणुकीत सुदामकाका यांनी काँग्रेसच्या बलाढ्य उमेदवार उषा चौधरी यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत ‘खाओ बदाम, लावो सुदाम’ ही घोषणा चांगलीच गाजली होती. जनतेचा व्यापक प्रतिसाद काय करिश्मा घडवून आणू शकते, हे या निवडणुकीने सर्वांना दाखवून दिले होते.
हाच कित्ता बच्चू कडू आणि आणि देवेंद्र भुयार या अपक्ष उमेदवारांनी अमरावतीत गिरवला. दोघेही आपली पहिली निवडणूक जनतेच्या उदंड पाठबळावर जिंकले होते. आता प्रीती बंड यांनाही असाच प्रतिसाद मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातील निवडणूक कमालीची चूरसपूर्ण होत आहे. विद्यमान आमदार रवी राणा हे यावेळेस महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. भाजपने उमेदवारी नाकारल्याने तुषार भारतीय यांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
भारतीय पक्षाबाहेर
बंडखोरीमुळं भाजपने भारतीय यांना निलंबित केले आहे. तुषार भारतीय यांच्या उमेदवारीने मतांची विभागणी अटळ मानली जात आहे. महाविकास आघाडीतर्फे सुनील खराटे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने प्रीती बंड अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. बंडखोरीमुळे मतांची विभागणी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. इतर अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी त्यांचा फारसा प्रभाव नाही.
यापूर्वी झालेल्या तीन निवडणुकीत रवी राणा यांचे समोर फारसे आव्हान नव्हते. राजकीय विरोधक जास्त झाल्याने त्यांचे समोर आव्हानांची मालिका तयार झाली आहे. राणांना निवडणूक जिंकणे सोपे राहिलेले नाही. राणा महायुतीचे उमेदवार असले तरी भाजपचा एक गट त्यांच्यापासून दुरावला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वरदहस्ताने ते आता भाजपवर प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
प्रतिष्ठा पणाला
रवी राणा यांचा मतदारसंघात चाहता वर्ग आहे. सहज उपलब्ध होणारा, मदतीला धावून जाणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा आहे. सणासुदीच्या काळात त्यांच्या कडून जीवनावश्यक वस्तुंचे वाटप होते. त्यामुळेच ते लोकप्रिय आहे. ‘बोलो रवी राणा, भरलो किराणा’ असं अमरावतीत बोललं जातं. त्यामुळंही ते अधिक लोकप्रिय आहेत. विरोधक राणा यांचा उल्लेख गारुडी असा करतात. जनता उपकाराची परतफेड वेळ आल्यावर निश्चित करते, यावर त्यांचा विश्वास आहे.
यंदाची निवडणूक मात्र राणा यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे ही निवडणूक जिंकणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे झाले आहे. चारही बाजूंनी विरोधक त्यांच्या पराभवासाठी जीवाचे रान करीत आहेत. त्यामुळे जिंकण्याची शर्यत अधिकच ‘टफ’ झाली आहे. बडनेरा मतदारसंघातून नक्की कोण बाजी मारणार? य बाबतचे भाकीत त्यामुळे वर्तविणे कठीण आहे.