राष्ट्रवादी शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. यावरून काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं उघड झालं. त्यामुळे क्रॉस व्होटिंग केलेल्या आमदारांवर कारवाई होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच संदर्भात काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. 19 जुलैला ही बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदारांबाबत महत्त्वाचा फैसला होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काँग्रेस कार्यकारिणीची 19 जुलैला होणारी ही बैठक जागा वाटपाच्या संदर्भात आहे. पण तरीही विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांबाबत या बैठकीत मोठा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व महत्त्वाचे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. दिल्लीतून के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला या बैठकीसाठी येणार आहेत. विधान परिषदेत निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
त्यांना पक्षात स्थान नाही
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही क्रॉस व्होटिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी पक्षांशी गद्दारी केली. त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांना पक्षात कोठेही स्थान राहणार नाही. जे घडलं ते वरिष्ठाना कळवलं आहे. त्यांच्याकडून भेटायला बोलावलं जाईल. किती लोक फुटले याचा आकडा येईल. आम्ही सगळ्या आमदारांवर विश्वास ठेवला होता. पण या लोकांनी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला आहे. आमच्या स्ट्रॅटेनुसार हे लोक वागले नाहीत. त्यांना पक्षात स्थान नाही हीच कारवाई असेल, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
आम्ही पूर्ण अलर्ट होतो
क्रॉस व्होटिंगवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यावर कारवाई होणार. मागच्या वेळी काही नावे आमच्या कानावर आली. मात्र मी कारवाई केली नाही. आता आम्ही पूर्ण अलर्ट होतो. आम्ही काही रणनीती आखली. त्यामुळे आमच्या पक्षातील असलेली घाण आमच्या लक्षात आली. त्याचा प्रस्ताव आम्ही कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठवला आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.