Police Action : स्वतःच्या हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न. त्यात जमिनीच्या किमती आसमानाला भीडलेल्या. याचाच फायदा घेत भूखंड दलालांची वक्रदृष्टी मिळेल त्या जमिनीवर पडायला लागली. यातूनच जमिनीचा झोल व्हायला लागला. त्यात अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे काम व्हायला लागल्यामुळे कुंपणच जेव्हा शेत खाते, तेव्हा न्याय मागणार कुणाकडे? अशी परिस्थिती निर्माण होते. चंद्रपूरमध्ये असाच एक जमिनीचा झोल समोर आला आहे. यात चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या माता महांकालीच्या यात्रेसाठी आरक्षित असलेला भूखंड परस्पर विक्री करून दलालांनी अधिकाऱ्यांसोबत जमिनीवरच डल्ला मारल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक निबंधक आणि महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
प्रसिद्ध मंदिर
महाराष्ट्रातील एक जागृत देवस्थान म्हणून माता महांकाली मंदिर सर्वदूर प्रसिद्ध आहे. माता महाकालीची यात्रा ही सबंध देशभर प्रसिद्ध आहे. अश्विन नवरात्र आणि चैत्रातील नवरात्र अशा दोन नवरात्रामध्ये येथे मोठी यात्रा भरत असते. महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश येथुन हजारो भाविक यात्रेसाठी दाखल होत असतात. हजारो भाविकांची योग्य ती सोय व्हावी, या दृष्टिकोनातून यात्रेकरिता शहरातील सर्वे क्रमांक 255 हा भूखंड आरक्षित ठेवला होता. मात्र या आरक्षित भूखंडावर आता पक्की घरे बांधली जात आहेत.
हा प्रकार महापालिकेच्या निदर्शनास आला. महापालिका आयुक्त विपीन पालिवाल यांनी यासंदर्भात तातडीने कारवाई करत बांधकाम करणाऱ्या 26 जणांना नोटीस बजावली. मात्र या नोटीसकडे दुर्लक्ष झाल्याने तीन वेळा नोटीस देऊनही बांधकाम थांबले नाही. सुरुवातीला या नोटीसकडे बांधकाम धारकांनी दुर्लक्ष केले. परंतु लागोपाठ आलेल्या नोटीसने त्यांचे धाबे दणाणले. सर्व 26 जणांनी महापालिकेत आपले सातबारा, विक्रीपत्रे आणि इतर कागदपत्र सादर केली.
अधिकाऱ्यांना धक्का
कागदपत्रांच्या पडताळणीत हा भूखंड महाकाली यात्रेसाठी आरक्षित असल्याचे लक्षात आले. त्यामुळे हा भूखंड 26 जणांना विक्री करणाऱ्या पाच जणांविरुद्ध प्रतीक रवींद्र देवतळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. युवराज बनकर आणि इतर काही आरोपींनी महाकाली यात्रेसाठी आरक्षित भूखंडाची विक्री करून 26 जणांकडून पैसे उकळले. विशेष म्हणजे हा भूखंड पूर्वी व्यंकटेश देवस्थानच्या नावावर होता. मात्र महाकाली यात्रेसाठी ही जागा आरक्षित करण्यात आली होती. याची कल्पना असतानाही जागेची विक्री केली गेली. या प्रक्रियेत युवराज बनकरने अवैधरित्या अभिन्यास तयार करून भूखंडाची विक्री केली. महापालिकेने मंजूर केलेला अभिन्यास न घेता युवराज बनकरने अवैध विक्रीपत्र तयार केले. सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मदतीने सातबारा उताऱ्यावर नोंद घेतली. महसूल विभागाने देखील या प्रक्रियेत फेरफार करून युवराज बनकर यांच्या कारनाम्याला हातभार लावल्याचे समोर येत आहे.
कारवाई करण्यात आली
यात्रेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाच्या जागेचा झोल करून त्याची परस्पर विक्री करणाऱ्या पाच आरोपींमध्ये युवराज बनकर, प्रशांत बनकर, इंदूबाई बनकर, प्रभाकर बनकर आणि किशोर बनकर यांचा समावेश आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 मधील कलम 52 व 53 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात काही महसूल अधिकारी आणि सहाय्यक दुय्यम निबंधक यांची चौकशी सुरू झाली आहे. स्थानिकांचे आरोप आहेत की, महसूल विभागातील काही अधिकारी आणि सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाने या विक्रीसाठी सहकार्य केले आहे. शहर पोलिस ठाण्यात याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. भविष्यात आणखी काही अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. महाकाली यात्रेचा भूखंड विकणाऱ्या व त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.