महाराष्ट्र

Bhandara Gondia : ‘जिंकलं तर आम्ही, हरलं तर तुम्ही’ हे चालणार नाही

Election Result: कारेमोरे संतापले; दोषांची जबाबदारीही घ्या

Tumsar Assembly : निवडणुकीचे कार्य सांघिक असते. उमेदवार जिंकल्यावर श्रेय घेण्याची कसर सोडली जात नाही. मात्र, पराजय झाल्यावर दुसऱ्यावर खापर फोडणे चुकीचे आहे. आपला दोष लपविला जाण्याची व ढकलण्याची खटपट केली जाते, असे परखड मत भंडारा जिल्हाच्या मोहाडी तुमसर विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार राजू कारमोरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आमदार कारेमोरे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला पराजय बघावा लागला. महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशाजनक वातावरण पसरले आहे. महायुतीला अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करता आली नाही. याचे चिंतन करण्याची गरज आहे. मतदारांपुढे विरोधकांनी आपले मुद्दे व्यवस्थित मांडले, तसेच मतदारापर्यंत पोहोचवले. यात विरोधक यशस्वी झाले. निवडणूक जिंकण्याची भाजपची रणनीती व योजना उत्कृष्ट होती.

आम्ही मात्र कार्यकर्ते यात कमी पडलो. काही ठिकाणी समन्वयाच्या अभाव दिसला. यावर आपण कोणाला दोषी धरणार नाही. आपलेही कुठे चुकले असेल. त्यामुळे आपले दोष लपवून, दोषांची कारणे शोधणे महत्त्वाचे वाटते. जिंकल्यानंतर जशी श्रेयासाठी आपण लढाई करतो. आपल्यामुळेच हे सर्व झाले आणि पराजयाच्या वेळी आपण दुसऱ्यावर वेगळी कारणे दाखवून ढकलणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

पुढील काळात महायुतीचे नेते व कार्यकर्त्यांनी समन्वयातून पुढे गेले पाहिजे. एकमेकांचे सहकार्य असले तरच विधानसभेचे गड सर करता येईल, असेही बोलायला ते विसरले नाहीत. तुमसर- मोहाडी विधानसभा मतदारसंघात आपण कुठे व कसे मागे पडलो, कसा फटका बसला याची बसून चर्चा व मंथन करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान धान खरेदीवर ते म्हणाले, 90 टक्के गोडाऊन खाली आहेत. पण शासकीय आधारभूत केंद्रात धान्याची खरेदी केली जात नाही. त्याचे कारण शेतकऱ्यांना खुल्या बाजारात चांगला दर मिळत आहे. त्यामुळे हा फरक दिसून येत असल्याचे कारेमोरे म्हणाले आहे.

Maharashtra : पावसाळी अधिवेशनात अकोल्यावर मंत्रिपदाची बरसात?

भोंडेकर नंतर आता कारेमोरे

विशेष म्हणजे, आमदार कारेमोरे यांच्या आधी शिंदे गटाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत महायुतीच्या नेत्यांवर परखड टीका केली होती. महायुतीच्या नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे भोंडेकर म्हणाले होते. त्यात आता अजित पवार गटाचे आमदारानेही उडी घेऊन आपला संताप व्यक्त केला असल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!