Buldhana Constituency: 2019 च्या निवडणुकीत आम्ही भाजपसोबत होतो. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात फारतर पाच सहा सभा घेतल्या. मात्र, आता ते राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात फिरताहेत. याचे कारण त्यांना समजून गेले आहे की, आता आपली जाण्याची वेळ आली आहे. ठाकरे संपलाय मग एवढ्या सभा कशासाठी असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
रविवारी रात्री खामगाव येथील मेहता शाळेच्या मैदानावर महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक, अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
मोदींचे, आम्ही जातो आमुच्या गावा
मोदी वारंवार सभा घेऊन ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा रामराम घ्यावा,’ या धर्तीवर सगळ्यांचा निरोप घेत आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडविली. केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा दावाही त्यांनी बोलून दाखविला.
उद्धव ठाकरे दोन तास उशिरा येऊनही सभेला भरगच्च उपस्थिती होती. ठाकरे म्हणाले, भ्रष्टाचार केलेल्या माणसाला आपल्या पक्षात घेतात आणि मोदीची गॅरेंटी म्हणतात. शेतकऱ्यांचे अश्रु पुसायला कधी आले नाहीत. आम्हाला नकली शिवसेना म्हणता, अहो ही काय तुमची डिग्री आहे का, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकरी आत्महत्या करतोय, शेतमालाला भाव नाही, युवकांना रोजगार नाही, माताभगिनी महागाईमुळे बेजार झाल्या, पण यांना त्याचे काही सोयरसुतक नाही. तुम्ही जगा अथवा मरा, पण मला पंतप्रधान करा, असा मोदींचा खाक्या आहे.
Lok Sabha Election : महायुती उमेदवाराच्या प्रचाराला स्टार प्रचारक येणार
भाजपला मतदान का करायचे, असा सवाल करून त्यांनी पीएम किसान योजनेची पोलखोल केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार टाकते आणि खतांवर 18 टक्के जीएसटी लावते. सहा हजार टाकायचे अन् जीएसटीच्या रुपाने आलेला पैसा खिशात घालायचा, हा कसला किसान सन्मान?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जिजाऊंच्या जिल्ह्यात भगव्याला कलंक लावणाऱ्या गद्दाराला याच मातीत गाडा, असे आवाहनही त्यांनी प्रतापराव जाधव यांचे नाव न घेता उपस्थितांना केले.
भाजपची मनमानी थांबवा : वासनिक
मुकुल वासनिक यांनी मोदींना हुकुमशहा असे संबोधून त्यांनी व भाजपने मनमानी चालविली असून घर व पक्ष फोडून लोकशाही तत्वांना तिलांजली दिल्याची टीका केली.