Dharmarao Baba Atram : राज्यामध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र त्यापूर्वी राज्य सरकारसमोर आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजुला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील उपोषण करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, यासाठी राज्यभर आंदोलनं सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर आरक्षणाचा मुद्दाही पुन्हा एकदा तापला आहे. धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याला आदिवासींनी विरोध दर्शवला आहे. सद्यस्थितीत भटक्या विमुक्त जातीतील धनगर समाज अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आहे. तर धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करू नये, अशी मागणी आदिवासी नेत्यांकडून होत आहे.
आत्राम यांचा इशारा
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी धनगर आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. धनगरांना अनुसूचित जमाती संवर्गातून आरक्षण दिल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे ते म्हणाले आहेत. अशातच विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षण आणि आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही राजकारणात खळबळ माजवत आहे.
काय प्रकरण आहे?
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी सातत्याने होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालेल्या धनगर आणि धनगड या दोन्ही जाती एकच आहेत. त्यात शाब्दिक बदल होणार असल्याचे स्पष्ट करणारा शासन निर्णय निघणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सरकारच्या या निर्णयाला सर्वपक्षीय आदिवासी समाजाच्या आमदारांकडून तीव्र विरोध होत आहे.
आमदार एकजुटीत
आदिवासी खासदार आणि आमदार याला विरोध करत आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नाविरोधात सर्वपक्षीय आमदारांमध्ये एकजूट दिसून येत आहे. आदिवासी समाजासाठी संकट निर्माण करून धनगर समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारने थांबवावा. अन्यथा 25 आमदार-खासदार राजीनामे देऊन समाजासाठी रस्त्यावर उतरतील. असा इशारा विक्रमगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी दिला आहे.
लवकरात लवकर तोडगा काढा
या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोडगा काढला नाही तर राजीनामा देऊन आंदोलन करू, असे शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी सांगितले. अशा स्थितीत मंत्रिमंडळात असलेले अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनीही धनगर समाजाच्या मागण्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.
Dhangar Reservations : पडळकर यांच्या वादग्रस्त विधानाने खळबळ
सरकारवर दबाव
दोन्ही समाजांनी आता सरकारवर दबाव वाढवण्याचं काम सुरू केलं आहे. उपोषणे सुरू आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा वाद पेटल्याने सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यातच आता धनगर समाजाचे नेते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आरक्षणासाठी मैदानात आले आहेत. पडळकर यांनी सोमवारी राज्यव्यापी रास्तारोको करण्याचं जाहीर केलं होते. धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा वादाच्या भोवरात सापडत आहे. यापूर्वीही विविध आदिवासी संघटनांनी याचा विरोध केला. आता उघड विरोध सुरू झाल्याने धनगर समाजाच्या आरक्षणाचा वाद संपण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे धनगर समाजाला खूश करावे तर आदिवासी समाज विरोधात जाईल अशी भीती सरकारला आहे.