परवा परवा बीडमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी हल्ला करण्यात आला. सुपारीबाज ‘चले जाव’च्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले. 20 ऑगस्टपासून राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी जर बीडसारखा प्रकार केला तर खबरदार. मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा मनसेचे नागपूर जिल्हाप्रमुख आदित्य दुरूगकर यांनी दिला आहे.
यासंदर्भात दुरूगकर म्हणाले, बीड आणि धाराशीवमध्ये जे घडले, तेथे महाविकास आघाडीतील नेते होते. मराठा समाजाच्या आडून ते असले प्रकार करत आहेत. बीडमध्ये शिवसेनेचा (उबाठा) जिल्हाप्रमुख गणेश वरेकरला आमच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. मविआचे लोक मराठा समाजाच्या आडून हे प्रकार करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारसुद्धा नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी आम्हीही बीडसारखे प्रकार करू शकतो, हे त्यांनी ध्यानात ठेवावे.
..तर आम्हीही रस्त्यावर उतरू !
मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण का द्यावे, हा आमचा प्रश्न आहे. तसा प्रयत्न झाल्यास आम्हीही रस्त्यावर उतरू. राडे घालू. सुरुवात त्यांनी केली. बंद आम्ही करू. महाराष्ट्रातील युवांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या तर आरक्षणाची गरजच पडणार नाही. एसबीसीचे लोक ओबीसींतून आरक्षण घेत आहेत. ओबीसींमध्ये 4 कोटी मराठा जोडले तर काय होईल, याचाही विचार झाला पाहिजे.
महामंडळाचे योगदान काय?
केंद्रात त्यांचे खासदार आहेत. हा प्रश्न दिल्लीतच सोडवला पाहिजे. केंद्राने आरक्षण 10 टक्के वाढवून द्यावे. राज ठाकरेंनी सांगितले की राज्यातून आरक्षण मिळणार नाही. ते खरं आहे. सर्वच समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक मागण्या आहेत. येथे प्रश्न आहे की, मराठा महामंडळाने आजवर काय योगदान दिले. समाजाला लॉलीपॉप दिला होता का, याचे उत्तर शोधून पुढे काम केले पाहिजे, असे दुरूगकर म्हणाले.
पवार आणि ठाकरेंचे राजकारण
जरांगे म्हणतात आम्ही मराठा कुणबी आहोत. सरकारने सांगितल्याप्रमाणे 1950 च्या पूर्वीचा कागद असेल तर त्यांनी तो कागद समोर ठेवावा. मग प्रश्न आपोआपच मिटेल. पण हे राजकीय षडयंत्र आहे. शरद पवार आणि उबाठाचे नेते राजकारण करत आहेत. आर्थिक निकषांवर आरक्षण असले पाहिजे.
जातीचे सेल नाहीत
आपली मुले कंपन्यांत कामाला लागली, तर आरक्षण कशाला हवे. येथील पाणी, माती वापरता, तर मग नोकऱ्या आम्हाला का नाहीत? राज ठाकरेंबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे. आरक्षण हा केंद्राचा विषय आहे, राज्याचा नाही. त्यांना अभ्यासाची गरज आहे. तसेही जातीच्या आरक्षणाचे सेल आमच्या पक्षात नाहीत. ओबीसी, एससी, एसटी, सेल नाहीत. जाती पातीच्या राजकारणाला मानत नाही, असेही आदित्य दुरूगकर यांनी सांगितले.