महाराष्ट्र

Maratha Reservation : फडणविसांची पुन्हा राजीनाम्याची भाषा!

Devendra Fadnavis : म्हणाले, ‘तर राजकारणातून सन्यास घेईन’

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा राजीनाम्याची भाषा केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. या पराभवाचे खापर देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडण्यात आले. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आरक्षणात फडणविसांचा अडथळा असल्याचा आरोप केला. त्यावर फडणविसांनी पुन्हा एकदा राजीनामा देण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर आरोप सिद्ध झाले तर राजकारणातून सन्यास घेईन, असेही त्यांनी म्हटले आहे.

जरांगे पाटील यांनी आता शिंदे साहेबांनाच विचारावं. मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना मी त्यांना थांबवलं, असं ते म्हणत असतील तर त्याच क्षणी मी राजीनामा देऊन राजकारणातूनही सन्यास घेईन, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे. अनेक वेळा जरांगे यांनी फडणवीस यांचं नाव घेऊन टीका केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काल पुणे जिल्ह्यातील दौंडच्या विविध प्रकल्प आणि योजनांसंबंधी बैठक झाली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं.

‘जर मी आरक्षणाच्या निर्णयात अडथळा आणला असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगावं. तसं असेल तर राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्ती घेईन,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा आणि निवृत्तीच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यात फडणविसांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांना मराठा विरोधी म्हणणं चुकीचं आहे,’ असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मात्र पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशाराच दिला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत आयुष्यातील मोठा फटका देवेंद्र फडणवीस यांना बसेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

‘सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही रोखली’

‘राजीनामा देऊन राजकारणातून सन्यास घेण्याची भाषा फडणवीस करत आहेत. याचाच अर्थ त्यांना पश्चाताप झालाय. तुम्ही राज्यकर्ते आहात. तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण रोखलं आहे हे सत्य आहे. तुम्ही सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी रोखली आहे. हे नाकारून चालणार नाही,’ असं मनोज जरांगे म्हणालेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!