Administrative Transfer : वरिष्ठ आयएएस अधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली महाराष्ट्रात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून ते काम सांभाळणार आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी हे फडणवीस यांचे मुख्य सचिव होते. प्रवीण परदेशी हे अमरावतीचे विभागीय आयुक्त होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रशासक कुलगुरू म्हणूनही त्यांनी काम केले होते. परदेशी यांनी केलेल्या कामामुळे प्रभावित झालेल्या फडणवीस यांनी त्यांना मुख्यमंत्री झाल्याबरोबर तातडीने आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतले होते.
आता पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्याने पुन्हा एकदा त्यांनी परदेशी यांना परत बोलावून घेतले आहे. परंतु यावेळी प्रवीण परदेशी हे नसून श्रीकर परदेशी यांची निवड मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवपदी झाली आहे. श्रीकर परदेशी यांनी अकोल्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांची कारकीर्द बरीच गाजली. परदेशी हे 2001 मधील तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत.
पंतप्रधानांसोबत काम
श्रीकर परदेशी हे महाराष्ट्राच्या सेवेतून प्रतिनियुक्तीवर दिल्लीत गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात कामाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. जून 2021 मध्ये परदेशी हे केंद्रातून पुन्हा महाराष्ट्रात परतले. 2022 मध्ये महाआघाडीचे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तेव्हा श्रीकर परदेशी यांची नियुक्ती फडणवीस यांच्या सचिवपदी करण्यात आली होती. तेव्हापासून श्रीकर परदेशी हे फडणवीस यांच्या संपर्कात आहे.
श्रीकर परदेशी यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त म्हणून अनेक जिल्ह्यात काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही त्यांच्या कामाची भुरळ पडली होती. त्यामुळेच त्यांना दिल्लीमध्ये प्रतिनियुक्तीवर बोलावून घेण्यात आले होते. 2015 मध्ये त्यांना थेट राजधानी दिल्लीत पीएमओ म्हणजेच पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. तेव्हापासून ते थेट पंतप्रधानांच्या कार्यालयात कार्यारत होते. या कार्यकाळात परदेशी यांनी भरीव कामगिरी केली.
Maharashtra Politics : राजकीय संस्कृती सुधारण्याची जबाबदारी…
पहिल्याच प्रयत्नात यश
श्रीकर परदेशी हे मूळचे सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ तालुक्यातील रहिवासी आहेत. ते वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधारक आहेत. परदेशी यांनी एमबीबीएस, एमडी शिक्षण पूर्ण केले. काही काळपर्यंत त्यांनी डॉक्टर म्हणूनही रुग्णसेवा केली आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी महाराष्ट्रातून पहिले येण्याची किमया श्रीकर परदेशी यांनी केली होती. पिंपरी चिंचवड आयुक्तपदावर असताना 20 मजली इमारतींचं अतिक्रमण त्यांनी जमीनदोस्त केलं होतं.
या कारवाईनंतर पुण्यातील लोकांनी त्यांना बुलडोझर मॅन अशी उपमा दिली होती. नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी कारकिर्द गाजली होती. यवतमाळ, कोल्हापूर, अकोला येथेही त्यांनी असेच काम केले. सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराचे मानकरी देखील ते ठरले होते. त्यांच्या कामाची माहिती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असा अधिकारी पीएमओमध्ये असावा असे वाटत होते. त्यामुळे त्यांना प्रतिनियुक्तीवर बोलावून घेण्यात आलं होतं.