विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेली प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिने आणखी एक प्रताप केला आहे. पोलिसांच्या नोटीसला केराची टोपली दाखवत ती सध्या वाशिममध्येच तळ ठोकून बसली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनासह एकूणच प्रशासकीय यंत्रणेमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. एवढ्या महत्त्वाच्या पदावरील बेजबाबदार व्यक्तीचे असे वागणे सध्या चांगलेच चर्चेत आहे.
पुणे पोलिसांकडून पूजा खेडकरला नोटीस बजावण्यात आली होती. पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र पूजा खेडकर अद्यापही वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात मुक्कामी आहे. तर दुसरीकडे तिने वाशिम मधील मुक्काम वाढवून घेतल्याची माहिती आहे.
देशासह राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पूजा खेडकर हे चर्चेत आले आहेत. पूजा खेडकर पुण्यात असताना तिची कारकीर्द चांगलीच गाजली. अवास्तव मागण्यांसाठी ती विशेषत्वाने चर्चेत आली. त्यानंतर तिच्या संदर्भात अनेक खुलासे बाहेर यायला लागले. तिच्या कुटुंबातील सदस्यही चर्चेत आले आहेत.
पूजासह तिची आई मनोरमा खेडकर हिलाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे वाद थांबता थांबेना अशी परिस्थिती आहे. पूजा खेडकर हिच्यावर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आरोप केले होते. या आरोपांसंदर्भात लेखी जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांकडून पूजा खेडकरला नोटीस बजावण्यात आली होती. यात त्यांना पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र पूजा खेडकर या अद्याप वाशिममधील शासकीय विश्रामगृहात मुक्कामी आहेत. त्यांनी विश्रामगृहाचे बुकींग वाढवून घेतली आहे.
वाशिममध्ये मुक्काम वाढवला!
पुणे येथून बदली झाल्यानंतर पूजा खेडकर वाशिममध्ये रुजू झाली. मात्र त्यानंतर कायम कुठले ना कुठले वाद पुढे येत गेले. ती सध्या वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात मुक्कामी आहे. पूजा खेडकरने वाशिमच्या विश्रामगृहाचे बुकींग शनिवारपर्यंत (दि.२०) वाढवले आहे. त्यामुळे आज संध्याकाळी वाशिमवरुन निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाशिमवरून ती पुण्याला जाणार की दिल्लीला, याबाबत उत्सुकता लागली आहे.
मसुरीमध्ये जॉईन होण्याचा आदेश!
पूजा खेडकरचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी संपवण्यात आला आहे. मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलावण्यात आलं आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली.