NCP Leader : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 पैकी 40 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत. असा दावा करुन राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री सुबोध सावजी आक्रमक झाले. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा केला तर मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. ‘राज्यातील सर्व मतदारांच्या वतीने मी आपला मर्डर करेल’ अशी धमकी सुबोध सावजी यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्तांना दिली आहे. त्या संदर्भातील पत्र त्यांच्या दिल्ली कार्यालयाला पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध
माजी महसूल मंत्री तथा अकोला व बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुबोध सावजी आपली अनोखी आंदोलन आणि अधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी धमक्यांसाठी प्रसिद्ध आहेत. संभाजी भिडे गुरुजी, जिल्हा परिषदेतील अधिकारी यांच्या मर्डरची देखील त्यांनी मागच्या काळात धमकी दिली होती. आता त्यांनी थेट देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांचाच गळा घोटून ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.
त्यांनी आज गुरुवारी ईमेल द्वारे पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, भारतात झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात असलेला मतदाराचा कौल हा महा-विकास आघाडीकडेच आहे. या आधारे 48 जागापैंकी 38 ते 40 लोकसभेच्या जागा या महा-विकास आघाडीच्या येणारचं. परंतु, जनतेच्या व माझ्या मनात संशय आहे की, आपण ई.व्ही.एम. मशीन मध्ये घोटाळा करुन लोकांच्या मतदानाचा लोकशाहीचा गळा घोटणार आहात. असे घडल्यास महाराष्ट्रातील मतदारांच्या वतीने या अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्या शिवाय राहणार नाही. माझे वय सध्या 80 वर्षाचे आहे. आता 10 किंवा 20 वर्ष जगायचे आहे. माझ्या डोळ्यादेखत महाराष्ट्रातील करोडो मतदारांच्या लोकशाही पध्दतीने वापरलेल्या मतदारांच्या अधिकाराचा आपण उघड-उघड खून करणार असाल, मुडदा पाडणार असाल तर मी या मतदारांच्या हक्काच्या सन्मानार्थ आपला मुडदा पाडेल. किंवा खून करण्यास मागे पुढे पाहणार नाही. लोकशाहीच्या इतिहासात मी माझे नाव अजरामर करेल. असे नमूद केले आहे.
आतापर्यंत इतक्यांना खुनाची धमकी !
सुबोध सावजी यांनी आतापर्यंत शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या आक्षेपार्ह विधानावरून राज्यभर पेटलेल्या आंदोलनानंतर भिडेंना अटक करा. नाही, तर मीच त्यांचा खून करेन, असे खळबळजनक विधान केले होते. याबद्दलचे पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिले होते., बुलढाणा जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास अशा लोकांची हत्या करेल, असा खळबळजनक इशारा सुबोध सावजी यांनी बुलढाण्यात दिला होता, राम कदम यांची जीभ छाटून आणणाऱ्यास 5 लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या सभांची शतकी खेळी भाजपसाठी कितपत फायद्याची!
सावजींनी लावलेल्या ‘पैजे’ ची चर्चा !
विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे जर निवडणूक हारले तर माजी मंत्र्यांना जवळपास 10 लाखांची कमाई होणार आहे. आणि खासदारांनी बुलढाण्याचा गड शाबूत ठेवला तर माजी मंत्र्यांना सव्वा तीन लाख रुपये मोजावे लागणार आहे. ही पैज लावली आहे. माजी मंत्री सुबोध सावजी यांनी. त्यांचा आत्मविश्वास इतका आहे की, त्यांना वाटते ही पैज ते यंदा जिंकणारच. प्रतापराव निवडणूक हारतील असा विश्वास त्यांना वाटत आहे.