Chandrapur Constituency : येत्या काळात कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, रोजगार या पंचसूत्रीवर काम करण्यासाठी प्राधान्य राहील. मतदारसंघातील लोकांना समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे येण्याची गरज भासणार नाही. लोकसभा मतदारसंघातील सर्व भागात सर्वांगीण विकासासाठी काम करू, अशी ग्वाही चंद्रपूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. लोकसभा निवडणुकी
संदर्भात त्यांनी व्हिजन सांगितले.
पुढील पाच वर्षांचे व्हिजन
पुढील पाच वर्षांत गावागावातील सिंचन, रस्ते, पिण्याचे पाणी, सेवा सहकारी सोसायटी, पतपुरवठ्याचे प्रश्न याविषयी लोकसभा मतदारसंघाची पुस्तिका तयार केली आहे. त्यावर काम करू. पहिल्या दोन महिन्यातच त्याचा रिझल्ट आलेला दिसेल,असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. आपण कोणतेही काम निवडणूक लक्षात ठेवून करत नाही. केवळ निवडणूक लक्षात ठेवून केलेले काम तात्पुरते असते. आपण कधीही असे काम करत नाही असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. आपण 4 वर्ष 11 महिने प्रचंड मेहनत घेतो. त्यानंतर ‘चाॅईइस’ जनतेचा असतो. राजकारणात विकासावर चर्चा व्हावी. आपण काय करणार याविषयी सांगावे पण आपल्या मतदारसंघात निम्न दर्जाच्या विषयावर चर्चा होते याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज दैवत
छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे असे सांगून ते म्हणाले, आग्र्याला 12 मे 1666 रोजी दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान झाला. त्याठिकाणी महाराजांची जयंती साजरी केली. आम्ही पुणेकर संस्थेच्या सहकार्याने पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. 29 फेब्रुवारीला हजारो सैनिकांनी हा उत्सव साजरा केला. 1953 पासून अफजलखानाच्या कबरी लगतचे अतिक्रमण हटत नव्हते, ते हटवले. असे 150 प्रकल्प हाती घेऊन पूर्ण केले.
दिलेला शब्द पूर्ण केला
दिलेला शब्द पूर्ण केला हीच आपली गॅरंटी आहे असे मुनगंटीवार म्हणाले. 1995 साली बल्लारशा तालुक्यासाठी आपण शब्द दिला होता तो पाळला. 300 पेक्षा अधिक कामे पूर्ण केली. पुढील काळात कामे पूर्ण करण्यास आपण बांधिल आहोत, असे मुनगंटीवार म्हणाले. ज्या कंपनीचा टाॅवर चांगला नेटवर्क देत आहे तेथे तुम्हाला कनेक्टिव्हिटी मिळते. परंतु मोदींच्या ऐवजी काँग्रेसचे सीम टाकाल तर गोंधळ होईल, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या स्थितीवर टीका केली. निवडणूक विकासाभोवती केंद्रीत राहावी असा प्रयत्न असतो. पण निवडणुकीच्या काळात नको ते मुद्दे उपस्थित केले जातात हे अयोग्य आहे. आता घोडा मैदान जवळ असून सुज्ञ मतदार योग्य कौल देतील, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी बोलून दाखवला.