Political War : उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील पुलराई गावामध्ये सत्संग आयोजित करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 122 जण ठार झाले आहेत. अनेक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. या सत्संगसाठी मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले असताना, ही घटना घडली. हाथरस येथील घटनेबाबत अखिलेश यादव यांनी योगी सरकारला धारेवर धरले आहे. ही दुर्घटना सरकारच्या दुर्लक्षामुळेच घडली, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला. या कार्यक्रमाची योगी सरकारला कुठलीही कल्पना नसल्याचे समोर आले, असे ते म्हणाले. जेव्हा जेव्हा असे कार्यक्रम होतात तेव्हा मोठ्या संख्येने लोक त्यात सहभागी होतात. अनेकांचे प्राण वाचू शकले असते, पण योगी सरकारचे नियोजन ढासळले. उपचारादरम्यान व्हेंटिलेटर, औषधी, आदी आवश्यक गोष्टी नसल्यामुळे पुरेसे उपचार मिळू शकले नाही. त्यामुळे याला कोणी जबाबदार असेल, तर भाजप सरकार जबाबदार आहे, असेही अखिलेश यादव म्हणाले.
योगी यांचे उत्तर
मुख्यमंतत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ही घटणा षड्यंत्र असल्याची भीती आहे. सिकंदरराव फुलराई येथील सत्संगातून परतणाऱ्या भाविकांच्या गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 122 भाविकांच्या मृत्यूची कारणे शोधण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. हा अपघात आहे की कट? या संदर्भात सखोल तपास करण्यात येत आहे.
घटनेच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. या घटनेत 122 जणांचा मृत्यू झाला आहे.
Akola News : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींकडून पैसे उकळणारा तलाठी निलंबित
या घटनेचे साक्षीदार असलेल्या रुग्णांकडूनही माहिती घेण्यात आली आहे. सिकंदरराव येथील फुलराई गावात जाऊन अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांनी पोलिस लाइनमध्ये येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी घटनेबाबत सविस्तर चर्चा केली.