Campaigning To Voters : विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर भाजप पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे. नागपुरातील प्रत्येक मतदाराशी संपर्क साधण्यासाठी भाजपकडून महाजनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी महिलांनी महागाई, सिलिंडरचे गगनाला भीडलेले दर, किराणा, तेलाच्या दरात झालेली वाढ आणि इंधनाचे दर याबाबत सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी केली.
महाराष्ट्रात सरकारकडून लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे महिलांनी स्वागत केले. परंतु सिलिंडर, तेल, किराण्याचे दर वाढल्याने घरातील ‘बजेट’ कोलमडल्याची भावना अनेक महिलांनी व्यक्त केली. मुलींना उच्च शिक्षणासाठी आणखी व्यापक सुविधा पुरविण्यात याव्या, याकडेही लक्ष वेधण्यात आले. पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे महागाई वाढत असल्याकडे अनेक गृहिणींनी लक्ष वेधले. महिला सुरक्षेच्या मुद्दाही काहींनी गडकरी यांच्यापुढे मांडला.
स्थानिक सुविधांचा अभाव
गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज आहे. त्यामुळे नागरिकांना सुविधा मिळेनाशा झाल्या आहेत. प्रभागांमध्ये नगरसेवक नाहीत. झोन कार्यालयात कोणी ऐकत नाही. महापालिका आयुक्त आणि अधिकारी नागरिकांना भेटत नाही. अशात रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता यासंदर्भातील समस्या घेऊन जावे कोणाकडे असा प्रश्न निर्माण होत असल्याचे गृहिणींनी गडकरींना सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेमध्ये मध्यमवर्गीयांची काळजी घ्यावी. विजेच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण सतत वाढते आहे, अशी तक्रारही अनेक महिलांनी केली.
Nitin Gadkari : ताडोबाला जाणारा पर्यटक नागपूरला का थांबत नाही?
नागरिकांच्या तक्रारी..
गडकरी यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महाजनसंपर्क अभियानात नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. सरकारकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षांबद्दलही माहिती घेतली. यासंदर्भात पाठपुरावा करू असे आश्वासन तेवढे यावेळी देण्यात आले. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) भाजप गाफिल होती. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मोठा गोंधळ झाला. अनेक मतदारांची नावे यादीतून गायब होती. मात्र वेळ निघून गेल्यावर आरडाओरड करण्यात काहीच अर्थ नव्हता हे भाजपच्या लक्षात आले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपने बुथपातळीवर आपली संपर्क यंत्रणा मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फायदा आगामी निवडणुकीत होईल, असे भाजपला वाटत आहे.