Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस उरले आहेत. राजकीय पक्षांच्या प्रचार सभा सुरू आहेत. सर्वच राजकीय पक्षांतील स्टार प्रचारक, नेते आणि कार्यकर्ते आपापल्या पक्षासाठी जोरदार काम करीत आहेत. अशात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांनी चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राऊंड येथे जाहीर सभेला मार्गदर्शन केले. चंद्रपुरातील जनतेला नमस्कार करीत, संवाद साधला. नरेंद्र मोदी यांनी देशाचा सन्मान वाढविण्याचे काम केले आहे, असे शाह यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने 15 लाख 10 हजार करोड रूपये महाराष्ट्राला दिले आहेत. विकासाचे विविध प्रकल्प राज्याला दिले आहेत. गडचिरोली येथील नक्षलवाद समाप्त करण्याचे कार्य नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात राम मंदिर निर्माण करण्यात आले. कलम 370 हटविण्यात आली. सीएए लागू केला आहे. आता लवकरच वक्फ कायदा बदलण्याची तयारी शासनाने सुरू केली आहे, असं शाह म्हणाले
विकासाला प्राधान्य
मोदींनी केलेल्या सर्व गोष्टींना महाविकास आघाडीतील शिवसेना नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काँग्रेसच्या टोकाचा विरोध करतात. उस्मानाबादचे धाराशीव, औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर तसेच अहमदनगरला अहिल्यानगर नाव देण्यात आले. परंतु या नामांतरणालाही काँग्रेस, उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी विरोध दर्शविला. चंद्रपुरातील भाजपच्या सर्व सहा उमेदवारांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शाहा यांची ही सभा पार पडली.
देशाला समृद्ध करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जगात देशाचा सन्मान वाढविला आहे. मोदी यांनी नक्षलवाद व दहशतवादमुक्त देश करण्याचे काम केले आहे. गडचिरोली सारखा नक्षलग्रस्त जिल्हा मोदी सरकारने नक्षलमुक्त केला आहे. छत्तीसगडमधील काही प्रमाणात शिल्लक असलेला नक्षलवाद 31 मार्च 2026 पर्यंत समाप्त होईल, अशीही घोषणा शहा यांनी केली.
व्यापक निधी
केंद्रातील मोदी सरकारने 15 लाख 10 हजार कोटींसह महाराष्ट्रात विविध प्रकल्प आणले आहेत. याउलट आघाडीने केवळ 3 लाख 91 हजार करोड विकासनिधी दिला, अशीही तुलनात्मक टिकाही शाह यांनी केली. महायुती सरकारला निवडून दिल्यास महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याने घालविलेले वैभव येत्या पाच वर्षांत पुन्हा मिळवून देणार, असेही अमित शाह म्हणाले.
Amit Shah : त्यांनी कामं केली नाहीत, अन् आता बकरे कापत सुटले आहेत !
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गांवर जाणारी सरकार पाहिजे की, औरंगजेब गँग सरकार पाहिजे? आता याचा निर्णय तुम्हीच घ्या, असे शाह म्हणाले. राज्यात महायुतीचे सरकार निवडून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करण्याचे आवाहनही शाह यांनी केले. यावेळी बल्लारपूरचे उमेदवार तथा वनमंत्री सुधीर मुनंटीवार यांनी मार्गदर्शन करताना जिल्ह्यात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. काँग्रेस धृतराष्ट्र, आहे अशीही टिका मुनगंटीवार यांनी केली. व्यासपीठावर बल्लारपूर मतदार संघाचे उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, वरोराचे करण देवतळे, राजुऱ्याचे देवराव भोंगळे, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा उपस्थित होते.