या लेखातील मते लेखकाची आहेत, त्याचेशी लोकहित सहमत असेलच असे नाही.
Ajit Pawar : ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशी मराठीत म्हण आहे. आपले काम फत्ते झाल्यावर उपकारकर्त्याला काही जण पटकन विसरतात. साधी कृतज्ञता दाखवित नाहीत. अशा व्यक्तींबद्दल ही म्हण वापरली जाते. आपलं अडलेलं काम अशा व्यक्ती समोरच्याकडून हक्काने करून घेतात. आपण मात्र निवांत बसतात आणि इतरांना कामाला जुंपतात. एकदा काम झाले की ते आपण कसे केले अशी फुशारकी मारायला ते विसरत नाहीत. आयुष्यात प्रत्येकाला असे अनुभव येत असतात. राजकारणात तर अनेकांना असा अनुभव येतो. हात धरून समोर आलेली माणसं हात झटकून केव्हा दूर जातील हे सांगता येत नाही. ‘मतलब निकल गया है तो पहचानते नहीं’ या गाण्यातूनही हाच अर्थ प्रतिबिंबित होतो.
सोयीनुसार भूमिका ..
राजकारणात बहुतेक राजकीय पक्ष आपल्या सोयीनुसार भूमिका बदलताना दिसतात. कोणत्या वेळी कोणते पाऊल उचलावे हे त्यांना माहीत असते. सत्तेसाठी वेगवेगळ्या तडजोडी बिनधास्त केल्या जातात. आपले राज्य या बाबतीत माहीर झाले आहे. कोणी स्वप्नातही विचार केला नसेल असे पक्ष एकत्र आले आहेत. भाजपची साथ सुटल्यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला मित्र बनवले, शरद पवार यांच्या साथीने आघाडीचे सरकार सत्तेवर आले. नंतर ते पाडले गेले हा भाग वेगळा. सत्तारूढ महायुतीचे सरकार यापेक्षा फारसे वेगळे नाही.
आता महाराष्ट्रात युतीचे सरकार सत्तारूढ आहे. शिवसेना (शिंदे गट, )राष्ट्रवादी (अजित पवार गट)भाजप सोबत आहे. हे पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या पुढे(२०२९) या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत ते ‘साथ साथ’ राहतीलच याची शाश्वती नाही. केंद्रीय गृहमंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते अमित शहा यांनी या पुढे स्वबळावर निवडणूक लढण्याचा मानस जाहीर केला आहे.
महाराष्ट्रातील यंदाची विधानसभा निवडणुक महायुती सोबत लढणार आहे. २०२९ ची निवडणूक भाजप स्वबळावर लढेल, एकट्या कमळाचे सरकार सत्तारूढ होईल असा दावा त्यांनी केला. अमित शाह यांच्या वक्तव्यावरून भविष्यातील राजकीय घडामोडींचा अंदाज बांधता जाऊ शकतो.
शिंदे गटाकडून सतत कुरबुर…
यापुढील राजकीय वाटचालीत भाजपसोबत शिंदे गट आणि अजित पवार गट राहतील की नाही याबाबत नक्कीच संभ्रम निर्माण होतो. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) सामिल झाल्यापासून शिंदे गट नाराज आहे. अजित पवार यांना सोबत घेण्याची गरज नव्हती असे त्यांचे म्हणणे आहे. निवडणूक जागा वाटपात हिस्सेदारी वाढली आहे हेही एक कारण आहे.
महाराष्ट्रात युतीचेच सरकार येणार
महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. काही निवडणुका देशाची राजकारणाची दिशा आणि दशा बदलतात. महाराष्ट्रातील निवडणुकीमुळे देशाची दिशा आणि दशा बदलेल असे त्यांनी ठासून सांगितले. जे सरकार काम करते तेच निवडून येते असेही त्यांनी नमूद केले. ‘निराशा झटकून टाका, कामाला लागा’, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
महाराष्ट्राबदल उत्सुकता!
महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत देशात उत्सुकता आहे. झारखंड, हरियाणात काय होणार हे कोणी विचारत नाही. निवडणूक दौऱ्याचे निमित्ताने आपण देशभर फिरतो तेव्हाही लोकांच्या बोलण्यात हीच उत्सुकता दिसून येते. या मेळाव्याला अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना कोण विजयी होणार असा प्रश्न विचारला तेव्हा कार्यकर्त्यांनी महायुती जिंकणार असा जोरात पुकारा केला.
‘विकेट पडू देऊ नका’ : देवेंद्र फडणवीस
सरकारने केलेल्या कामामुळे जनता आपल्या सोबत आहे. मात्र अतिआत्मविश्वासामुळे आपली ‘विकेट पडू देऊ नका’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्यात केले. राज्यातील तीन कोटींपेक्षा जास्त जनता राजकीय योजनांचा लाभ घेत आहे. त्यांची मते आपल्याला मिळाल्यास राज्यात महायुतीचे सरकारी येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपला आहे. मराठी, हिंदू मते त्यांना मिळत नाहीत. त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचतात असा टोलाही त्यांनी लगावला. आपले सर्व विरोधक एकत्र आले आहेत. ते जिंकण्यासाठी काहीही करू शकतात, त्यामुळे अति आत्मविश्वास ठेवू नका. गाफील राहू नका, असा इशारा त्यांनी दिला.
एका पक्षाचे सरकार येणे अशक्यच : अजित पवार
अमित शाह यांनी या पुढे स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला. अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवली. सगळ्यांना आपला पक्ष वाढवायचा आहे. पण महाराष्ट्रात एका पक्षाचे सरकार येऊ शकत नाही. महाराष्ट्राची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. इतर राज्यात एका पक्षाचे सरकार येऊ शकते. महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. राज्यात 1985 नंतर चाळीस वर्षात एका पक्षाचे सरकार आले नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अमित शहा यांनी असे वक्तव्य केले, असे असावे असे अजित पवार म्हणाले. प्रत्येकाला आपला पक्ष ‘सिंगल लार्जेस्ट पार्टी’ करण्याचा अधिकार आहे अशी भूमिकाही त्यांनी मांडली.