Polling On Ballet : मतदान प्रक्रियेवर शंका आल्यानं सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावात मंगळवारी (3 डिसेंबर) पुन्हा मदतान घेण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी हा निर्णय जाहीर केला आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून याला प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळं गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उत्तम जानकर विजयी झाले आहेत. मारकडवाडीतून महायुतीच्या राम सातपुते यांना मोठ्या प्रमाणावर मतदान झालं.
एकूण निवडणूक प्रकियेवर संशय आल्यानं गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याची तयारी दर्शवली आहे. उत्तम जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे ईव्हीएमचे कटकारस्थान असल्याचा गावकऱ्यांना संशय आहे. ग्रामस्थांच्या दाव्यानुसान मारकडवाडीमध्ये जानकर यांना मोठ्या प्रमाणावर मतदान झालं. परंतु मतमोजणीत ईव्हीएममधून वेगळेच आकडे समोर आले आहेत. निवडणुकीत राम सातपुते यांना 843 मतं मिळाली आहेत. जानकर यांना 1 हजार 03 मतं मिळाली.
गडबडीचा दावा
निवडणुकीतील एकूणच मतदानावर गावकऱ्यांना संशय आहे. त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी त्यामुळंच पुन्हा मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांच्या दाव्यानुसार सातपुते यांना मिळालेल्या 843 मतांची संख्या चुकीची आहे. ग्रामस्थांनी मतदान केल्यानुसान त्यांना शंभर ते दीडशेच्या आसपास मतदान होणे अपेक्षित होते. परंतु तसं झालेलं नाही.
मतदानावर संशय असल्यानं गावात फलक लावण्यात आले आहेत. त्यात बॅलेट पेपरवरील मतदानासाठी प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. निवडणूक विभागानं या प्रक्रियेला मनाई केलेली नाही. ग्रामस्थांकडून मतपत्रिका छापण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांना या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. गावातील प्रत्येकाने निवडणुकीत ज्याला मतदान केलं त्यालाच मतपत्रिकेवर शिक्का मारण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. निवडणूक निकालानंतर राज्यभरातून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरू झाल्यानंतर मतपत्रिकेवर निवडणुकीसाठी सरसावलेलं मारकडवाडी हे राज्यातील पहिले गाव ठरलं आहे. गावानं आता निवडणुकीचा फैसला होऊनच जाऊ द्या, असा निर्धार केला आहे. गावातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आल्यानं सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सद्य:स्थिती महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष ईव्हीएमच्या विरोधात लढा देत आहेत. त्यात वंचित बहुजन आघाडीनंही आता उडी घेतली आहे.