या लेखात प्रकाशित झालेली मते ही लेखकांची आहे. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असे नाही.
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील हाथरसजवळ असलेल्या फुलराई या गावांतील एका सत्संगात चेंगराचेंगरी झाली. यात 122 भाविकांचा करूण अंत झाला. ह्रदय हेलावून सोडणारी, मन सुन्न करणारी ही घटना मंगळवारी घडली. या घटनेस जबाबदार असणारा भोलेबाबा फरार आहे. भोलेबाबाची चरणरज (पावलाखालील) माती मिळविण्यासाठी अनुयायांमध्ये चढाओढ लागली. त्यानंतर ही दुर्घटना घडली. या घटनेत झालेले मृत्यू नैसर्गिक नाहीत, ते अंधश्रद्धेचे बळी आहेत.
हाथरस पासून 47 किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलराई येथे भोलेबाबा उर्फ नारायण साकार हरी यांचा सत्संग आयोजिण्यात आला होता. लगतच्या जिल्ह्यातील 20 हजार भाविक अनुयायी यावेळी उपस्थित होते. गर्दीच्या तुलनेत सभागृह लहान होते. बाहेर भाविकांची गर्दी होतीच. बाहेर पडण्यासाठी असणारे गेटही लहान होते. त्यामुळे सत्संग संपल्यावर गोंधळ उडाला. सत्संग झाला. बाबा बाहेर पडेस्तोवर सुरक्षा रक्षकांनी गर्दी रोखून धरली होती. नंतर गर्दीला मोकाट सोडले. बाबांचा प्रसाद व आशीर्वाद म्हणून चरणरज मिळवण्यासाठी चांगलीच झुंबड उडाली आणि अनर्थ घडला.
प्रचंड गर्दीने घात
सर्वांना बाहेर पडण्याची घाई झाली. लोक एकमेकांवर तुटून पडले. महिला आणि मुलांची शक्ती कमी पडली. त्यांचा नाहक बळी गेला. दीडशेवर भाविक जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भोले बाबांच्या दरबारात जल्लोषाचे वातावरण होते. भयावह दुर्घटनेनंतर त्याचे रूपांतर आक्रोशात झाले. क्षणात होत्याचे नव्हते झाले. सोबत आलेले आप्तजन परतीच्या प्रवासात नाहीत, ही वेदना अनेकांच्या चेहऱ्यावर उमटली. मृतात लहान मुले आणि महिलांचे प्रमाण मोठे आहे.
पोलिस शिपायाचा मृत्यू
एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने महिलांचे मृतदेह बघून रजनेश नावाच्या 30 वर्षीय पोलिस शिपायाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. त्याची आपत्कालीन ड्यूटी एका जिल्हा रुग्णालयात लावण्यात आली होती. एकाच वेळी इतके मृतदेह पाहून एका पोलिसाचा मृत्यू होतो यावरून हा प्रकार किती गंभीर होता, हे लक्षात येते.
सत्संग घेणारा नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा पोलिस दलात नोकरीत होता. आपण इंटेलिजन्स ब्युरो मध्ये होतो असे तो सांगायचा.
26 वर्षांपूर्वी त्याने नोकरी सोडली. परमेश्वराचा साक्षात्कार झाला असे सांगून त्याने बाबागिरी सुरू केली. उत्तर प्रदेश, हरयाणा व अनेक ठिकाणी त्याचे सत्संग होत होते
साध्या साधुसारखा पहेराव कधीच परिधान न करणाऱ्या भोलेबाबाची राहणी व पहेराव एकदम ‘पॉश’ असायचा. बाबांच्या दर्शनाने , चरणधुळीने, तेथील पाण्याने सारे रोग-व्याधी दूर होतात. संकटे टळतात, परिस्थिती सुधारते या अंधश्रद्धेतून त्याच्या दरबारात येणाऱ्च्याची संख्येत वाढ होत राहिली. मानसिक खच्चीकरण झाल्याने नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या भोळ्याभाबड्या जनतेला आपल्या सापळ्यात ओढण्याचे प्रयत्न करीत बुवा बाबांकडून होतात. ही मंडळी खोटेनाटे उपाय सांगून अंधश्रद्धा पसरवितात.
हा गोरखधंदा अनेक ठिकाणी बिनबोभाट सुरू आहे. त्याला अजूनही पायबंद घालता आलेला नाही. ही खरेतर शोकांतिकाच आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि अघोरी प्रथा यांच्यासंदर्भात कायदा आहे. परंतु देशातील अनेक राज्यात असा कोणताही कायदाच नाही.
साम्राज्य उद्ध्वस्त व्हावे
अंधश्रद्धा पसरवून भोलेबाबा भक्तांची फसवणूक करीत आहे.
त्यांचे साम्राज्य बुलडोझर लावून उद्ध्वस्त करण्यात यावे अशी मागणी समाज माध्यमातून होत आहे. या बाबाची संपत्ती लिलाव करून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या बाबास व त्यांच्या कार्यकर्त्यांवर तत्काळ गुन्हे नोंदविण्यात यावे, असा सूर जनमानसात उमटत आहे. भोले बाबासारखी नौटंकीबाज मंडळी जनतेची दिशाभूल करुन बिनबोभाट आपले उखळ पांढरे करीत आहेत. हा धंदा तत्काळ बंद होणे गरजेचे आहे.
भाविकांच्या मृत्यूची घटना अक्षम्य दुर्लक्षामुळे घडली आहे.
गर्दीच्या तुलनेत सुरक्षा व्यवस्था तुटपुंजी होती. दरबार चालविणाऱ्या मंडळींनी जिल्हा प्रशासनाला अनेक बाबतीत अंधारात ठेवले. गर्दी उसळल्यावर कोणती परिस्थिती निर्माण होईल, याचे गांभीर्य कोणीच लक्षात घेतले नाही. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतकांच्या वारसांना उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारने दोन लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नेटवर्क तोडणे गरजेचे
देशभरात अनेक ठिकाणी कथीत बुवा बाबांकडून भाविकांची लुट सुरू आहे. ही मंडळी समाजात अंधश्रद्धा पसरवून समाज स्वास्थ्य बिघडवित आहेत. काही ठिकाणी अप्रिय प्रकार ही घडल्या आहेत. काही बाबांनी भक्तांचे आर्थिक व शारीरिक शोषणही केले आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. प्रशासनाने वेळोवेळी अशा ठिकाणची झाडाझडती घेऊन सत्य जाणून घेणे आवश्यक आहे.
बरेच राजकीय नेते अशा बाबांना आश्रय देता. अभय देतात हे देखील दिसून येते. हाथरसजवळ घडलेल्या घटनांसारख्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. एखादी गोष्ट मोफत मिळते म्हणून उडणारी झुंबड ही नवीन नाही. अशा घटनांत निष्पापांचा बळी जातो ही खरी वेदना आहे. यावर कठोर कायदा व उपाय गरजेचा आहे.