Kolhapur Assembly Elections : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अद्याप जागावाटप झालेलं नसलं तरी महायुतीमध्ये विद्यमान आमदारालाच पुन्हा उमेदवारी देण्याचा फॉर्मुला असल्याचे दिसून येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्याचा दौरा करत आहेत. नुकतंच त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातला भेट दिली. यावेळी कागल विधानसभा मतदारसंघामधून हसन मुश्रीफ निवडणूक लढवतील, असं जाहीर केलं.
कोल्हापूरमधील कागल विधानसभा मतदारसंघाबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. आजपर्यंत अनेक चढउतार आले, मात्र कागलकरांनी हसन मुश्रीफ यांच्या मागची ताकद कमी केली नाही. या निवडणुकीमध्ये देखील आपण सर्वांनी महायुतीचे उमेदवार म्हणून हसन मुश्रीफ यांना इतक्या उच्चांक मतांनी निवडून द्या की समोरच्याला धडकी भरली पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचे पहिला उमेदवार जाहीर केला. आता मुश्रीफांचे कट्टर विरोधक असलेले भाजप नेते समरजीत सिंह घाटगे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
घाटगे आहेत इच्छुक
यापूर्वीही कागलमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे. 2019 ला भाजपने समरजित घाटगे यांना तिकीट नाकारलं होतं. मग त्यांनी अपक्ष निवडणूक लढली होती. पण 2019 ला त्यांना यश मिळालं नाही. हसन मुश्रीफ विजयी झाले होते. तेच समरजित घाटगे यंदा विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. भाजपकडून तिकिट मिळावं अन् महायुतचे अधिकृत उमेदवार होण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मात्र अजित पवारांनी थेट मुश्रीफांचं नाव जाहीर केल्याने कोल्हापुरात मात्र चर्चाच चर्चा होताना पाहायला मिळत आहे..
घाटगे यांच्या भूमिकेकडे लक्ष महायुतीमध्ये अजित पवार गट आणि हसन मुश्रीफ सामील झाल्यापासून मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक भाजपचे नेते समरजीत घाटगे अस्वस्थ होते. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर देखील नाराजी दर्शवली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये थांबत कागलमधून निवडणुकीची तयारी सुरू केली. गेल्या निवडणुकीत अपक्ष लढूनही समरजीत घाटगेंनी जवळपास 90 हजार मतदान घेतलं होतं.
कागलची जागा राष्ट्रवादीला जाणार की भाजपला यावरून सातत्याने चर्चा सुरू होत्या. गेल्या काही दिवसांपासून समरजीत सिंह घाटगे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी ऑफर देण्यात येत असल्याच्या चर्चाही सुरू आहे. मात्र आता अजित पवार यांनी थेट हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केल्याने समरजीत घाटगे काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.