Party With Difference : अकोला जिल्ह्यातील भाजपमध्ये सुरू असलेली धुसफूस आता डोकं वर काढत आहे. भाजपच्या नेत्यांकडून देण्यात येणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळं अनेक नेते प्रचारापासून दूर आहेत. प्रचाराची रणधुमाळी आता अधिक रंगतदार झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी (12 नोव्हेंबर) अकोल्यात प्रचारसभा घेतली. या सभेतून नितीन गडकरी यांच्या नीकटवर्तीयांपैकी एक असलेले मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे हे स्वत: व त्यांचा फोटो गायब दिसला. पिंपळे यांचा फोटोच नसल्यानं सभेच्या ठिकाणी उलटसूलट चर्चा सुरू झाली.
अकोला जिल्ह्यातील चार उमेदवारांचे फोटो योगी यांच्या व्यासपीठावर असलेल्या बॅनवर होते. यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे बळीराम सिरस्कार यांच्याही नाव आणि फोटोचा समावेश होता. मात्र हरीश पिंपळे तेवढे ‘मिसिंग’ होते. त्यामुळं सभेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. हरीश पिंपळे यांचा वाढदिवस होता. त्यामुळं भाजपनं त्यांना असं कसं ‘गिफ्ट’ दिलं, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. मूर्तिजापूर मतदारसंघात योगी आदित्यनाथ यांची वेगळी सभा झाली. ही सभा केवळ पिंपळे यांच्या प्रचारासाठी होती.
खरं कारण काय?
अकोला शहरात आयोजित सभा ही अकोला पूर्वचे उमेदवार रणधीर सावरकर, अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे, अकोला पश्चिमचे उमेदवार विजय अग्रवाल आणि बाळापूरचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांच्या प्रचारासाठी होती. पिंपळे यांच्या प्रचारासाठी वेगळी सभा झाल्यानं अकोल्यातील सभेत त्यांचा फोटो नव्हता. याशिवाय सभेच्या आयोजनासाठी लागणारा हातभारही पिंपळे यांच्याकडून अकोल्याच्या सभेत लागला नव्हता. त्यामुळंही कदाचित पिंपळे यांचा फोटो नसावा अशी, चर्चा भाजप नेत्यांमध्ये आहे.
Akola BJP : योगींच्या सभेतून आमदार पिंपळेंचा फोटो गायब कारण..
पिंपळे यांच्यासाठी योगी यांची स्वतंत्र सभा झाली हे खरं आहे. पिंपळे यांनी सभेच्या आयोजनासाठी हातभार लावला नसेल हे देखील खरं असू शकते. परंतु पिंपळे हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यामुळं जिथे चार फोटो टाकले तिथे पाचवा फोटो टाकायला काय हरकत होती. एक फोटो वाढला असता तर बॅनरवरील जागा आटली असतील का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
हरीश पिंपळे यांनी योगी आदित्यनाथ यांची सभा घेतली. त्यावेळी त्यांच्या बॅनरवर कोणाकोणाचे फोटो होते, हे तपासलेही गेले असावे, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळं भाजपमध्ये सध्या चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सद्य:स्थितीत अकोल्यात भाजपमध्ये अकोला पश्चिम मतदारसंघ वगळता उर्वरित मतदारसंघांमध्ये एकी दिसत आहे. केवळ अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपने अनेक नेते, माजी नगरसेवक प्रचारापासून दूर आहेत.