Voting : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच 85 वर्षावरील आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा हक्क उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांत 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान 3799 पैकी 3561 मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला. यात मलकापूर, बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव आणि जळगाव जामोद या सातही मतदारसंघातील मतदारांचा समावेश आहे.
यामध्ये 85 वर्षावरील एकूण 3107 पैकी 2904 व 674 पैकी 642 दिव्यांग मतदारांनी आणि 18 पैकी दोन अत्यावश्यक सेवेतील मतदारांनी गृहमतदान केले. बुलढाणा जिल्ह्यात मतदान केंद्रांवर उपस्थित राहणे शक्य नसलेल्या प्रपत्र 12 ड भरलेल्या 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतदान पथकामार्फत घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्यावतीने विधानसभेसाठी पहिल्यांदाच गृह मतदान हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमात जिल्ह्यातील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
यामध्ये गृहमतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून मलकापूर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 320 आणि 78 दिव्यांग, बुलढाणा मतदारसंघात 85 वर्षांवरील 275 आणि 58 दिव्यांग, चिखली मतदारसंघात 85 वर्षांवरील 433 आणि 144 दिव्यांग, सिंदखेडराजा मतदारसंघात 85 वर्षांवरील 703 आणि 34 दिव्यांग, मेहकर मतदारसंघात 85 वर्षांवरील 583 आणि 149 दिव्यांग, खामगाव मतदारसंघात 85 वर्षांवरील 200 आणि 74 दिव्यांग, जळगाव जामोद मतदारसंघात 85 वर्षांवरील 390 ज्येष्ठ नागरिक आणि 105 दिव्यांग मतदारांनी गृहमतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला.
दबावाला बळी पडू नका – जिल्हाधिकारी
२० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषाला, दबावाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यातील मलकापूर, बुलढाणा, मेहकर, सिंदखेड राजा, खामगांव, चिखली आणि जळगांव जामोद या सातही विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या निवडणुकीच्या काळात मतदारांना विविध प्रकाराचे आमिष, दबाव टाकण्याचे प्रकार उघडकीस येतात.
तर कारवाई होणार
निवडणूक काळात मतदारांना कोणत्याही प्रकारचे आमिष, दबाव टाकले जात असल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे आणि कोणत्याही आमिष, दबावाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावे. भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या तक्रारींसाठी सीव्हिजील ॲप उपलब्ध केले असून त्यावरही तक्रार करता येणार आहे. तसेच जिल्ह्यात आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवरील कारवाईसाठी भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथके, पोलीस प्रशासन, आयकर विभाग आणि जीएसटी विभागाचे पथक कार्यरत करण्यात आले आहेत. मतदारांनी आचारसंहितेच्या उल्लंघनाविषयीच्या घटना या पथकांच्या निदर्शनास आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.