सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं दर्शनासाठी खुली करण्यात आली. यावेळी आयोजित सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सारेच मोठे नेते उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यासाठी निधी मागण्यावरून पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला आणि जोरदार हशा पिकला.
ते म्हणाले, ‘दोन्ही राजांनी जिल्ह्यासाठी मागितलं पण पालकमंत्र्यांनी काही मागितलं नाही, असं व्हायला नको. म्हणून आता मागण्या करत नाही. नंतर प्रत्यक्ष भेटून जिल्ह्याच्या अडीअडचणी सांगेन. आता वेळ घेत नाही. पालकमंत्र्यांनी मागितल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मला नाही म्हणणार नाही.’
शुक्रवारी (ता. 19) सातारा येथे शस्त्रांच्या कवायतीसह ‛शिवशस्त्रशौर्यगाथा’ हा दिमाखदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत वाघनखं दर्शनासाठी खुली करण्यात आली. यावेळी शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले, शंभुराज देसाई यांचीही उपस्थिती होती.
ऐतिहासिक वारश्यांची राजधानी सातारा इथे वाघनखं आली ही अभिमानाची गोष्ट आहे. महाराजांनी ज्या वाघनखांच्या सहाय्यानं हिंदवी स्वराज्यावर आलेलं आक्रमण परतवून लावलं, ती वाघनखं इथे आल्याचा अभिमान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हे शक्य होऊ शकलं, या शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
लंडनच्या संग्रहालयांनी अनेक अटी घालून दिल्या आहेत. त्याचे आपण पालन करणार आहोत. सरकारी संग्रहालयातच वाघनखं ठेवण्यास त्यांनी सांगितले आहे. हळद-कुंकू लावायला मनाई केली आहे. आपण अटी शर्थी मोडल्या तर ही वाघनखं कधीही परत जातील, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
साताराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सात महिने वाघनखं सातारा शहरात आहेत. आमच्या प्रशासनाने चांगली व्यवस्था केली आहे. वृद्धांना व्हीलचेअरवरून दावण्याची व्यवस्था केली आहे. प्रशासन चांगली व्यवस्था करत आहे. पहिलाच मान सातारला मिळाला, याचा अभिमान असल्याचे शंभुराजे देसाई म्हणाले.