Maharashtra day celebration : प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला अनुपस्थित राहिलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाला येतील अशी आशा होती. मात्र आताही अकोलेकरांची निराशाच झाली. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. अकोला जिल्ह्याच्या नशिबी ध्वजारोहणालाही पालकमंत्री हे येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात नवीन सरकार सत्तेवर आले. त्यानंतर जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मिळाले. त्यावेळी फडणवीस हे विदर्भातील सहा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील कोणत्याही ध्वजारोहण सोहळ्याला फडणवीस उपस्थित राहू शकले नाहीत. महाविकास आघाडी सरकारमध्ये पालकमंत्री बच्चू कडू ध्वजारोहणाला यायचे. मात्र,त्यानंतरचे ध्वजारोहण हे मंत्र्याविनाच झाल्याची माहिती आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये राज्यात नव्याने पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यात अकोला जिल्ह्याचाही समावेश होता.
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे अकोल्याचे पालकमंत्री पद देण्यात आले. विखे-पाटील हे अकोल्याचे पालकमंत्री झाल्यापासून आतापर्यंत केवळ पाच ते सहा वेळा जिल्ह्यात आले. प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला ते आले नाहीत. या सोहळ्याला तरी पालकमंत्र्यांकडून ध्वजारोहण होणार, अशी आशा अकोलेकरांना होती. मात्र तेव्हाही निराशा झाली होती.
मोजके अपवाद वगळले तर अकोला जिल्ह्याला अनेकदा बाहेर जिल्ह्यातील पालकमंत्रीच मिळाले आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले आहे. बाहेरील जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी किमान ध्वजारोहणाच्या सोहळ्याला उपस्थित राहतात. परंतु विखे-पाटील यांची महाराष्ट्र दिन सोहळ्याच्या ध्वजारोहणालाही मिळणार नसल्याचे दु:ख अकोलेकरांना आहे.