Gram Panchayat Administration : अनेक गावांत वेगवेगळ्या चालीरीती व परंपरा असतात. बुलढाणा जिल्ह्यातील मातीत एक असेही गाव आहे, ज्यातील प्रत्येक घरातील व्यक्ती सैन्यदलात आहे. सैन्यातून ते देशसेवा करीत आहेत. सैनिकांबद्दल या गावात सर्वांनाच प्रचंड आदर आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी एक ठराव घेतला आहे. देशसेवा करताना शाहिद झालेल्या सैनिकांच्या नावाने गावाचे नामकरण करण्यात येणार आहे. त्याबाबत ठराव घेण्यात आला आहे. राज्य सरकारला हा ठराव पाठविण्यात आला आहे. आता या आदर्श गावाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांच्या अंत्यसंस्काराचा खर्च ग्रामपंचायत उचलणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरुवाती पासूनच निर्माण
माजी सैनिकांचा अंत्यसंस्कार आतापर्यंत या गावात साधेपणाने केला जात होता. आता माजी सैनिकाचे पार्थिव सजविलेल्या वाहनातून देण्यात येणार आहे. देश भक्तीपर गीत लावत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दगडवाडी ग्रामपंचायतने अंत्यसंस्काराचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील दगडवाडी रघुवीरवाडी येथे माजी सैनिकांना हा सन्मान मिळणार आहे. सैनिकांना सन्मान गावात सुरुवातीपासूनच करण्यात येतो. आता त्यात भर पडणार आहे.
अनेक जण सैन्यात
गावात सुरुवाती पासूनच सैनिकांचा आदर केला जातो. गावातील रघुनाथ जायभाये हे 2002 मध्ये मणिपूर येथे कार्यरत असताना शहीद झालेत. त्यांचे नाव या गावाला देण्यात आले आहे. रघुवीरवाडी असे गावाचे नाव ठरले आहे. त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. शहिदांचे स्मारक या गावांमध्ये उभे झाले आहे. 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला नियमित या स्मारकाचे पूजन केले जाते. गावातील माजी सैनिक व शहीद जवानांच्या परिवाराला घरकुल देण्यात आले आहे. आता नव्याने ही ग्रामपंचायत माजी सैनिकांना सन्मान देणार आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराचा खर्च ग्रामपंचायत उचलणार आहे. सरपंच चंद्रकला घुगे यांनी तसा ठरावच पारित केला आहे.
अनेक सुविधा
गावात एकूण 12 माजी सैनिक आहेत. 16 सैनिक भारतीय सैन्य दलातत सेवा देत आहेत. माजी सैनिक व शहीद जवानांची पत्नी यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहण करण्यात येते. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी व 1 मे रोजीचे ध्वजारोहण माजी सैनिकांच्या हस्ते केले जाते. कार्यरत सैनिक व माजी सैनिकांना ग्रामपंचायतीकडून सुविधाही दिल्या जातात, असे सरपंच चंद्रकला घुगे यांनी सांगितले.