केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अलीकडेच एका पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकाचे प्रकाशन श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या हस्ते झाले. पंडित धनागरे महाराजांचे जीवन चरित्र अर्थात ‘तपोनिधी’च्या दुसऱ्या आवृत्तीचा हा प्रकाशन सोहळा होता. विजय पोफळी यांनी हे चरित्र लिहिले आहे. अतिशय मंगलमय वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात गोविंददेव गिरी यांनी गडकरींबद्दल केलेले विधान सर्वाधिक चर्चेत आहे.
या कार्यक्रमाला श्रोत्यांची सभागृहात हाऊसफुल्ल गर्दी होती. गडकरींचं भाषणही विशेष खुललं होतं. दरम्यान, गोविंददेव गिरी महाराजांनी ‘तपस्वी’ या विषयावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘आपापल्या क्षेत्रात कुठलीही तक्रार न करता, अतिशय शांतपणे कर्तव्य पार पाडणाराही तपस्वीच असतो. असे एक तपस्वी सध्या माझ्या बाजुला बसले आहेत. त्यांचं नाव आहे नितीन गडकरी. त्यांनी केलेल्या कार्याची चर्चा फक्त देशात नव्हे तर देशाच्याही बाहेर होत आहे. संपूर्ण जग आता त्यांच्याबद्दल बोलू लागलं आहे. संपूर्ण भारतात कुणालाही ज्यांच्याविषयी तक्रार नाही, अशी व्यक्ती म्हणजे नितीन गडकरी आहेत.’ महाराजांनी गडकरींना तपस्वी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
यावेळी गडकरींनी धनागरे महाराजांसोबत असलेल्या ऋणानुबंधांच्या आठवणी उलगडल्या. ते म्हणाले, ‘माझ्या बालपणी पंडितकाका धनागरे महाराजांशी जवळचा संबंध आला. माझ्या आईशी आणि आमच्या कुटुंबाशी त्यांचे विशेष ऋणानुबंध होते. नर्मदा प्रदक्षिणा केल्यानंतर त्याचे वर्णन त्यांनी माझ्या आईकडे केले होते. ते वर्णन प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मला मिळाली. त्यांचे विचार ऐकण्याची उत्सुकता पूर्वीच्या तरुणांमध्येही होती. आजही त्यांचे जीवनचरित्र वाचून तरुण पिढीला नक्कीच दिशा मिळेल.’
पालखी मार्गाचे समाधान
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पालखी मार्ग बांधता येत असल्याचे समाधान व्यक्त केले. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या वृक्षवल्लीचा उल्लेख केला आहे, ती या मार्गावर प्रत्यक्षात साकारण्याचाही प्रयत्न आहे. ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज आदींची वचनं समाज संस्कारित करणारी आहेत. या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना ही वचनं वाचायला मिळतील, कानावर पडतील असं काही करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
‘केवळ भगवंताचं गुणगाण गाऊ नका’
ज्या लोकांच्या पावलावर पाऊल टाकून जीवनाचं सोनं होतं, अशांची चरित्र माझ्यादृष्टीने संतचरित्र असतात. केवळ भगवंताचे गुणगान गाऊ नये. ज्याला धर्माच्या मार्गावर चालायचे असेल त्याला संत चरित्र देखील वाचावी लागतील. असा आदेश आमच्या पूर्वासुरींनी दिला, असे गोविंददेवगिरी महाराज म्हणाले. वेदांनी धर्मशास्त्राची तत्त्व शिकवली. पण ती अंगीकारायची असतील तर महाभारत, रामायण वाचावे लागेल, असेही ते म्हणाले.