Assembly Election : काँग्रेस नेते राहुल गांधीची यात्रा आणि मेहनत देशभरात गाजली. देशातील विषमता दूर करण्याचे काम राहुल गांधी यांनी सातत्याने सुरू ठेवलं. सर्व जाती-धर्मांमध्ये समानता यावी, म्हणून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पाऊल उचलले आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. मत प्राप्त करण्यासाठी धर्मा-धर्मांमध्ये विष कालवण्याचे काम सुरू होते. त्याला आता जनता संतापली आहे. केवळ हिंदूंसाठी नव्हे. सत्तेसाठी हिंदुत्वाचे कार्ड वापरणाऱ्यांना आता जोरदार चपराक मिळत आहे, अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली. नागपुरात ते बोलत होते.
सत्तेमध्ये राहून प्रचंड भ्रष्टाचार आणि पैसे गोळा करण्याचे काम सुरू आहे. हे निश्चितपणे जनतेने आता ओळखले आहे. हरियाणा आणि जम्मू कश्मीर येथील निवडणुकीचा निकाल अपेक्षित होता. 2024 मधील लोकसभेच्या निवडणुकीमध्येच मोदींचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन त्यांना सत्तेवर यावं लागलं. चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांची मदत मोदींना घ्यावी लागली. त्यामुळेच त्यांची सत्ता टिकून आहे.
चारही राज्यातील काँग्रेसची सत्ता आल्यानंतर नरेंद्र मोदींना सत्ता सोडावी लागेल. खुर्ची रिकामी करावी लागेल. हे जनतेने ठरविले आहे. त्यामुळे हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही ठिकाणी काँग्रेस बहुमतानी जिंकत आहे. तसेच महाराष्ट्रत देखील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) 200 जागांचा आकडा पार करेल. खोकेबाज आणि धोकेबाज सरकारला जनता हद्दपार करेल, असा विश्वास आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
सरकारी तिजोरीची उधळपट्टी
लाडकी बहीण योजना मतांसाठी राबविली जात आहे. मोठमोठे स्टेज करण्यात येत आहेत. सरकारी तिजोरीतून खर्च करीत आहेत. रॅम्प तयार करणे, मोठे इव्हेंट लाडकी बहिणीच्या माध्यमातून घेतले जात आहेत. ही सरकारी पैशांची उधळपट्टी सुरू आहे. योजना आणली, पण योजनेच्या माध्यमातून बहिणींना त्रास देण्याच काम सुरू झालं आहे. गाडीत बसा नाहीतर दीड हजार मिळणार नाहीत. बहिणीच्या एका पिशवीत टाकायचे आणि दुसऱ्या पिशवीतून काढून घेण्याच काम सरकार करत आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकच झाले नाही, तिथे शोध घेण्याच काम संभाजी राजे करीत आहेत. हा शोध प्रतिकात्मक आहे. पंतप्रधानांच्या हस्ते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बांधतो असे म्हणाली होती. परंतु त्या ठिकाणी एक वीटही रचू शकले नाही. हे महायुतीचे अपयश आहे. हे अपयश शोधण्याच काम संभाजी राजे करत असतील तर स्वागत आहे, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधाऱ्यांच्या मुखात आणि विचारांमध्ये खोटारडेपणा आहे. त्यांचा डीएनए खोटा आहे, असं म्हणायला हरकत नाही. सत्तेत बसून गांधी आणि नेहरू यांना जबाबदार धरत असाल, तर तुम्ही सत्तेत कशाला बसले आहात. सरकारी पैशातून मेजवानी कशाला मारत आहात. जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे. तुम्ही काय करणार हे सांगायला पाहिजे. पण पाप तुम्ही करणार, तिजोरी तुम्ही साफ करणार आणि बोट काँग्रेसकडे दाखविणार. हे जनतेला समजले आहे. सोयाबीनला हमीभापेक्षा कमी भाव मिळत असेल तर पंतप्रधान यांनी बोलताना या नतभ्रष्ट लोकांकडून माहिती घ्यावी.
जनतेचं वाटोळ
महानगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामीण लोकांचं आणि शहरी लोकांचा वाटोळ होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच कार्यरत नाही. लोकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी त्रास होत आहे. अडीच वर्ष झाले निवडणूक नाहीत. त्यामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात लूट चालली आहे. जनतेवर मोठ्या प्रमाणात टॅक्स लावण्याचे काम सत्ताधाऱ्यांचा आशीर्वादाने सुरू असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.
राजकुमार पटेल यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशाबद्दल वडेट्टीवार म्हणाले की, कुणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिलेला नाही. महाराष्ट्राचे गुजराती जोडीने मिळून नुकसान केले आहे. पक्ष फोडले, आमदार फोडले. आज खोक्यांचं सरकार आहे. प्रत्येकाला खोक्यांची अपेक्षा आहे. जिथे खोके तिथे आम्ही, असे म्हणणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे, जिथे खोके आहे, तिथे धोके होऊ शकतात. जनता यांची जिरवल्याशिवाय राहणार नाही, हे समजून घ्यावं, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.