Swatantryaveer Savarkar : कनार्टक सरकारने विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धरामय्या यांच्या सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची चांगलाच संताप व्यक्त केला आहे. कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल, असं मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना नमूद केलं. हा प्रकार गंभीर आणि निंदनीय असल्याचंही ते म्हणाले.
ज्यांनी-ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, ते पराभूत झालेत. काही जण बुडले. आता पुढचा नंबर कर्नाटक सरकारचा आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आहे. आपण हे विश्वासाने नमूद करीत आहोत. आजच हे लिहून घ्यावे. पुढच्या निवडणुकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पराभव होईल. याला कारण म्हणजे त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
मी सावरकर
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला होता. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी ‘मी सावरकर’ असं नमूद करीत या प्रकाराचा निषेध व्यक्त केला होता. त्यावेळी देखील सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे त्याग आणि बलिदान काँग्रेसवाले ओळखुच शकत नाहीत, असं नमूद केलं होतं. आता कर्नाटक सरकारनं सावरकर यांचा विधानसभेतील फोटो काढण्याचा निर्णय घेतल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
सिद्धरामय्या यांच्या सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. बेळगावच्या सुवर्ण सौधा विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो आहे. सावरकर यांचं कर्नाटकसाठी कोणतंही योगदान नाही. त्यामुळं सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. हा निर्णय तेव्हा घेण्यात आला ज्यावेळी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषकांसाठी बेळगाव येथे मेळावा आयोजित केला होता. त्याला कर्नाटक सरकारने विरोध केला. पोलिसांनी जमावबंदी देखील लागू केली होती. अशातच काँग्रेस सरकारचा निर्णय पुढं आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी रोष व्यक्त केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार अमर आहेत. त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना इतिहास कधीही माफ करणार नाही, असंही मुनगंटीवार यांनी नमूद केलं.
Sudhir Mungantiwar : विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सरसावले मुनगंटीवार
सुवर्ण विधान सौधा
सुवर्ण विधान सौध कर्नाटकातील बेळगाव येथे असलेली विधानभवनाची इमारत आहे. कर्नाटकच्या स्थापना दिनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या स्मरणार्थ सुवर्ण विधान सौध असे नाव देण्यात आले आहे. ही इमारत चार मजली आहे. 300 जागा असलेले सभागृह, 100 सदस्यांचा कौन्सिल हॉल, 450 आसन क्षमतेचा सेंट्रल हॉल आहे. 38 मंत्र्यांचे कक्ष येथे आहे. 14 बैठकगृह आहेत. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसाठी सचिवालय, बैठक हॉल आणि कार्यालयीन निवास व्यवस्था आहे. 51 हेक्टर जमिनीवर आहे.या विधान भवनाच्या इमारतीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटोही आहे. 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कार्यकाळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो बसविण्यात आला होता.