Mumbai : धारावीची सर्व जमीन अदानीला देण्याचा सरकारचा निर्णय आहेच पण वरळीतील दुध डेअरीची कोट्यवधी रुपयांची जमीनही स्वस्तात देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईतील सर्व जमिनीचे अधिकारच अदानीला देण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असे गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र व महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला विकू देणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले. अदानीच्या प्रश्नावर ते पत्रकारांशी बोलत होते.
नाना पटोले म्हणाले, ‘अदानीच्या धारावी प्रकल्पाबद्दल काँग्रेसने आधीच भूमिका स्पष्ट केलेली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावर भूमिका जाहीर केलेली आहे. परंतु भाजप सरकार मात्र मुंबईतील महत्त्वाचे व मोक्याचे भूखंड अदानीच्या घशात घालत आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे टेंडर दुबईच्या एका कंपनीला मिळाले होते पण नंतर ते रद्द करुन अदानीला देण्यात आले, अशी टीकाही त्यांनी केली.
महायुती सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर चालत आहे. मुंबईसह महाराष्ट्र गुजरातला विकण्याचा भाजपा-शिंदे सरकारचा प्रयत्न काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही. राज्यातील जनतेत महायुती सरकारच्या या गुजरात धार्जीणेपणाबद्दल प्रचंड विरोध आहे, असेही ते म्हणाले.
वाघनखांवर टीका
महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे म्हणून कार्यक्रम केला. पण, ही वाघनखे महाराजांची नाहीत. इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांनी लंडन म्युझियमला पत्र पाठवून त्याची माहिती घेतली आहे. म्युझियमने ते स्पष्ट केले आहे. असे असतानाही महायुती सरकारने जनतेचा पैसा खर्च करून सोहळा केला, अशी टीका नाना पटोले यांनी केली. निवडणुकीच्या तोंडावर छत्रपतींच्या नावाने नकली वाघनखं आणून त्याचे प्रदर्शन करण्याचा सरकार अयशस्वी प्रयत्न करत आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
स्मारकाचे काय झाले?
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्याचे जाहीर केले. २०१७ मध्ये जलपूजनही केले. त्या स्मारकाचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला.
आमच्या योजनांची नावे बदलली
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणली. १० वर्षापासून महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या भगिनींना १५०० रुपये देण्याची घोषणा केली. काँग्रेस पक्षाच्या योजनांची नावे बदलून त्या राबवल्या जात आहेत. संजय गांधी निराधार योजना, राजीव गांधी जन आरोग्य योजना यासारख्या विविध योजना काँग्रेस सरकारने आणल्या व जनतेला त्याचा लाभ दिला असे नाना पटोले म्हणाले.