Officer From Administration : महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन घेण्यात आले. सरकार नवीन असल्याने केवळ पाच दिवस अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. त्यातील तीन दिवस आता पूर्ण झाले आहेत. शुक्रवारी (20 डिसेंबर) अधिवेशनाचा समारोप होऊ शकतो. त्यामुळे यंदा पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना लवकर सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या बच्चे कंपनीला बस्स बेटा.. मंडेला घरी भेटू, असे ‘प्रॉमिस’ केले आहे. अधिवेशनानंतर लगेचच ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशन होणार आहे. त्यामुळे मुंबई पुण्याकडून आलेल्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या मुलांनी ख्रिसमसच्या सुट्ट्या कशा घालवायच्या याचे प्लॅनिंग केले आहे.
सर्वसाधारणपणे 25 डिसेंबर ते एक जानेवारीपर्यंत अनेक शाळांना ख्रिसमस निमित्त सुट्ट्या आहेत. सलग सुट्ट्या आल्यानंतर मुंबई पुण्याकडे आऊटिंगला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. यंदा हिवाळी अधिवेशन कमी दिवसांचे आहे. शुक्रवारी अधिवेशनाचा समारोप होऊ शकतो. त्यामुळे अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबई पुण्याकडून नागपूरमध्ये आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ख्रिसमसच्या सुट्ट्यांचे प्लॅनिंग आपल्या मुलाबाळांसह केले आहे.
अनेकांचा संवाद
विधान भवन परिसरात असलेले दुसऱ्या जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी नागपूरमध्ये आल्यापासून नियमितपणे आपल्या परिवाराच्या संपर्कात आहेत. नागपूरमध्ये असलेल्या उन्हाची चर्चा जगभर होते. मात्र यंदा थंडीने सगळ्यांनाच हुडहुडी भरवली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नागपूरमध्ये किती गारवा आहे याची माहिती सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय त्यांच्याकडून घेत आहेत. अधिवेशनासाठी मोठ्या प्रमाणावर महिला अधिकारी आणि कर्मचारी देखील नागपूर शहरात मुक्कामी आहेत. यामध्ये पोलीस दलातील महिलांची संख्या मोठी आहे.
आपल्या बच्चे कंपनीपासून सध्या अनेक महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी शेकडो किलोमीटर दूर आहेत. सध्या या साऱ्यांचेच व्हिडीओ कॉलवरून नियमित संभाषण सुरू आहे. अधिवेशन म्हणजे नेमके काय असते हे जाणून घेण्याची उत्सुकता या सगळ्यांच्या मुलाबाळांना आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी देखील आपल्या मुलांना व्हिडीओ किंवा फोटो काढून पाठवत आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी नागपूर मेट्रोची सफर देखील फावल्या वेळात केली.
Winter Assembly Session : मोर्चे नसल्याने यंदा ‘खाकी’च्या जीवाला आराम
बारा तास ड्युटी
अधिवेशनाच्या कामावर नेमण्यात आलेल्या जवळपास 90 टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांना सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत म्हणजे बारा तासावर काम करावे लागत आहे. विशेषत: बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना तर तात्पुरत्या उभारलेल्या तंबूमध्ये रात्र काढाव्या लागत आहेत. सध्या नागपूरचे तापमान चांगलेच घसरले आहे. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या पोलिसांना तंबूमध्ये रात्र काढताना शेकोटी आणि चहा यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे अधिवेशन लवकर संपवावे, अशी प्रतीक्षा हे सगळे करीत आहेत.