Farmers Issue : राज्यभरातील शेतकऱ्यांना सरकारच्या एका मोठ्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. पिकविम्याची उर्वरीत रक्कम देण्यास कॅबिनेट मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दणक्यामुळे ही रक्कम राज्यभरातील शेतकऱ्यांना मिळण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी राज्यात सर्वांत प्रथम मुनगंटीवार यांनी आग्रही भूमिका घेतली होती. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना पत्र दिले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटल्यानंतर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात बैठक घेण्याची ग्वाही दिली होती.
राज्यस्तरीय बैठक..
मुंबईत येताच काही तासातच मुनगंटीवार यांनी यासंदर्भात मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे तातडीने मुंडे यांनी राज्यस्तरीय बैठक बोलावली. मुनगंटीवार यांनी हा मुद्दा राज्यस्तरीय करीत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी भूमिका घेतली. शेतकऱ्यांची विनाकारण अडवणूक करणाऱ्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुनगंटीवार यांनी धारेवर धरले. त्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही याबाबत गंभीर दखल घेतली. तातडीने हा विषय मार्गी लावला जाईल, असे त्यावेळी जाहीर करण्यात आले.
बैठकीचे अनेक साक्षीदार
कृषिमंत्री मुंडे यांच्या समोर सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेली आग्रही भूमिका चंद्रपूरसह राज्यभरातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिली. त्यानंतर तातडीने कामाला सुरुवात झाली. अशातच आता सोमवारी (30 सप्टेंबर) कॅबिनेट बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुनगंटीवार यांनी मिळवून दिला आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिकविम्याची उर्वरित रक्कम तातडीने देण्यासाठी मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगामातील उर्वरित रक्कम मिळण्यासाठी मुनगंटीवार प्रचंड आग्रही होते.
राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा काही इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होत्या. याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल मुनगंटीवार यांनी घेतली. कृषिमंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्यात घेण्यास त्यांनी भाग पाडले. त्यामुळे राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली निघाला.
Sudhir Mungantiwar : चंद्रपुरातील बहिणींसाठी आणखी एक ‘गुडन्यूज’
शेतकऱ्यांसाठी आक्रमक भूमिका
सोमवारी (30 सप्टेंबर) मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात आवर्जून चर्चा झाली. त्यावेळी मुनगंटीवार यांनी हा विषय पुन्हा एकदा लावून धरला. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सुधीर मुनगंटीवार सुरुवातीपासून आक्रमक आहेत. धान पिकाच्या बोनसबाबत त्यांनी विधिमंडळात आवाज उठवला होता. महविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला त्यांनी यावरून कोंडीत पकडले होते. नंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येताच मुनगंटीवार यांनी धान पिकाच्या बोनसचा मुद्दा मार्गी लावला. अगदी त्याच प्रमाणे त्यांच्या आग्रही भूमिकेमुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाला आहे.