महाराष्ट्र

Gondia News : गोवंशाच्या वाहतुकीवर गोंदिया पोलिस मिळवताहेत पकड !

Police Action : वाहतूक करणाऱ्या 56 जनावरांसह 11.68 लाखांचा माल केला जप्त

Animal Slaughter : कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या 56 गोवंश जनावरांसह दोन महिंद्रा बोलेरो पिकअप वाहने जप्त करण्यात आली आहेत. सालेकसा पोलिसांनी 11.68 लाख रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कवडी जंगल परिसरात गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.

सालेकसा पोलिस स्टेशनचे कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. कवडी जंगल परिसरात गोवंश जातीच्या जनावरांची निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याचे कळताच पोलिस निरीक्षक भूषण बुराडे यांच्या नेतृत्वातील पथकाने तातडीने कारवाई करत दोन बोलेरो पिकअप वाहनांना अडवले.

निर्दय वाहतूक..

अडवलेल्या वाहनांमध्ये 56 लहान-मोठ्या गोवंश जनावरांना दोरीने दाटीवाटीने बांधण्यात आले होते. ज्यामुळे त्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता होती. वाहनांमध्ये चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. तसेच जनावरांना निर्दयतेने कत्तलीसाठी नेले जात असल्याचे स्पष्ट झाले. सदर प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत अंदाजे 10 लाख रुपये आहे. गोवंश जनावरांची किंमत 1.68 लाख रुपये इतकी आहे. या कारवाईत एकूण 11.68 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

तीन आरोपींना अटक..

या प्रकरणात आकाश श्रीराम गायधने (वय 24, रा. सिल्ली, ता. भंडारा), मारोती कवडू गभने (वय 26, रा. सिल्ली, ता. भंडारा) आणि विजय मांगीलाल हटीले (वय 36, रा. पानगाव, ता. सालेकसा) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 च्या कलम 5 (अ) (1), 5 (अ) (2), 6, 9 आणि प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा 1960 च्या कलम 11(1)(ड) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Birsi Airport : गोंदियावासीयांना पुन्हा झाली कोरोनाची आठवण, काय आहे कारण ?

ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, डीवायएसपी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक भूषण बुराडे, पोलिस हवालदार डोंगरे, पोलीस शिपाई अजय इंगळे, विकास वेदक, आणि रामप्रसाद मेंढके यांनी महत्वाची भूमिका बजावली. सालेकसा पोलिसांच्या या कारवाईमुळे गोंदिया जिल्ह्यातील अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांची कार्यतत्परता दिसून येते.

अशा कारवाईमुळे अवैध कत्तलीच्या प्रकरणांना आळा बसेल, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. या घटनेमुळे प्राण्यांसाठी मानवतेच्या भावना जागृत होण्याची गरज आहे. असे प्रकार टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने अधिक कडक पावले उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!