Leader’s Wrath : कोणतेही काम करण्यासाठी भाईजीकडे हक्काने येता. काम झाल्यानंतर तुम्ही कोण, आम्ही कोण असा प्रकार सुरू आहे. पुढे पुढे भाईजी, मागे वळून पाहता कुणीच नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. तुमसरच्या (Tumsar) शकुंतला सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा झाला. त्याला पटेल यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची चांगलीच फिरकी घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार राजू जैन, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, धनंजय दलाल, विठ्ठल कहालकर, यशवंत सोनकुसरे, देवचंद ठाकरे, धनेंद्र तुरकर, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, सुनील थोटे, योगेश सिंगनजुडे आदी मेळाव्याला उपस्थित होते. खासदार पटेल पुढे म्हणाले, भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील अनेकांची कामे माझ्याकडे येतात. ती कामे आपण करतो. मात्र त्यानंतर तुम्ही कोण, आम्ही कोण असा व्यवहार केला जातो. असे होता कामा नये. दिल्ली व मुंबईत वजन राहावे यासाठी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, हे विसरू नका.
नियोजनाचा सल्ला
दिल्ली आणि मुंबईत जिल्ह्यातील कामे करून घ्यायची असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय गरजेचा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी नियोजन करून कामाला लागा, अशी सूचनाही पटेल यांनी कार्यकर्त्यांना दिली. महायुतीचे (Mahayuti) उमेदवार सुनील मेंढे यांच्या पराभवानंतर पटेल यांचे प्रथमच जिल्ह्यात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. काही कार्यकर्त्यांना सज्जड दमही त्यांनी दिला आहे. प्रफुल पटेल यांनी भाषणात गेल्या 15 वर्षांपासून भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील राजकारणाचा अनुभव सांगितला.
निवडणुकीत मिळालेल्या यशानेच राजकीय कारकीर्द व वजन वाढते, हे त्यांच्या शब्दाशब्दांत जाणवत होते. त्यांनी केलेल्या आवाहनावरून महायुतीमध्ये ही जागा अजित पवार गटालाच जाईल, अशीच चर्चा आता रंगली आहे. अद्यापही विधान सभेच्या दृष्टीने महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्मूला ठरलेला नाही. त्यातही प्रफुल पटेल यांनी दावेदारीच करून टाकल्याने महायुती टेन्शन येऊ शकते. लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत महायुतीला फटका बसला. त्याचे खापर अनेक ठिकाणी दादांच्या राष्ट्रवादीवर फोडण्यात आले. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही (RSS) यासंदर्भात वाच्यता केली. त्यामुळे महायुतीमध्ये काही काळ तणाव होता. परंतु नंतर भाजपनेच सामंजस्याची भूमिका घेतली. आता अजित पवार राज्यभर दौरा करून राष्ट्रवादीची पाळेमुळे घट्ट करीत आहे. तसाच प्रयत्न विदर्भात प्रफुल पटेल करताना दिसत आहे.