Business World : केंद्रीय अर्थसंकल्पात कस्टम ड्युटीत कपातीची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ही घोषणा करताच दोन तासात सोन्याचे दर तीन हजारांनी कोसळले आहेत. निर्मला सीतारामन यांनी एनडीए सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासंदर्भात मोठ्या घोषणा करण्यात आल्या. सर्वसामान्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोन्याचांदीच्या दरावरही त्यामुळे परिणाम झाला आहे.
निर्मला सीतारामण यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपत नाही, तोच सराफा बाजारावर त्याचा परिणाम दिसला. सोनं-चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. अवघ्या दोन तासांमध्ये प्रति तोळा तीन हजारांनी सोने स्वस्त झाले. सोन्याचे नवीन दर बाहेर येताच दुपारनंतर अनेकांनी सोन खरेदीसाठी गर्दी केली. ठोक सराफा बाजारातही सोने-चांदीच्या खरेदीसाठी मोठी उलाढाल सुरू झाल्याचे दिसून आले. मुंबई, पुणे, जळगाव खानदेश, अमरावती, अकोला, नागपूर येथील पेढ्यांमध्ये दिवसभर बऱ्यापैकी हालचाल होती.
विदर्भातही घसरण
कस्टम ड्युटीमध्ये कपातीच्या घोषणेचा परिणाम विदर्भातील सराफा बाजारातही दिसून आला. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सोन्याचे दर विदर्भात 73 हजार 200 रुपये होते. त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत हा दर घसरून 71 हजार 100 रुपये झाला. बुलढाण्यात सोन्याचे दर 73 हजार होते. हेच दर 68 हजार रुपये प्रति दहा ग्राम झालेत. वाशिमध्ये 75 हजार 500 वरून दर 70 हजार 500 झालेत. त्यानंतर सोने खरेदीच्या व्यवहारात मोठी तेजी आली. सरकारी निर्णयानंतर सोन्याच्या दरात किती चढ-उतार होऊ शकते याचा अंदाज नसल्याने अनेकांनी मंगळवारीच (ता. 23) सोने व चांदी खरेदी उरकून घेतली. त्यामुळे श्रावणसरी सोन्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बरसात करणाऱ्या ठरल्या.
सरकारने सोने-चांदीच्या सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. याआधी सोने-चांदीचे सीमा शुल्क 15 टक्के होते. आता यात कपात करून सीमा शुल्क थेट 6 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. याचा अर्थ सरकारने सीमा शुल्कात निम्म्याने कपात केली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरांमध्ये देशभरात त्याचा परिणाम दिसेल, असे सांगण्यात येत आहे. प्लॅटिनमचे सीमा शुल्क आता 6.4 टक्के झाले आहे. अमोनियम नायट्रेटवरील सीमा शुल्क सात वरून दहा टक्के झाले आहे. सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा शुल्कात कपात झाल्यानंतर सोन्याचा सुधारित दर जाहीर करण्यात आला. त्यामुळे उत्सवाच्या काळात ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.