महाराष्ट्रात महायुतीचे सरकार दुसऱ्यांदा स्थापन झाले. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधीही पार पडला. पण उपमुख्यमंत्री नंबर एक आणि उपमुख्यमंत्री नंबर दोन कोण, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते आधी स्पष्ट करावे, असे काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.
नागपुरात आज (12 डिसेंबर) वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सभागृहात आम्ही उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की दोघेही उभे होतात. त्यांच्यासोबत आमचीही अडचण होते. त्यामुळे आता कुठेतरी हे स्पष्ट झाले पाहिजे. आणि उपमुख्यंत्र्यांच्या छातीवर नंबर एक, नंबर दोन, असे बॅज लावले पाहिजे. नंबर एक कोण ठाणे की पुणे, हे स्पष्ठ झालं पाहिजे. त्यांना महाराष्ट्रमध्ये मिळालेलं यश हे अनपेक्षित आहे. सत्ता त्यांच्या डोक्यात गेलेली दिसत आहे. जनतेच्या आशीर्वादाने नव्हे तर ईव्हीएमच्या आशीर्वादाने हे सरकार आले असल्याचा आरोप जनतेतून होत आहे.
सत्तेमध्ये बसलेल्या तिघांना यश पचवायला उशीर लागणार आहे. मंत्रिमंडळातील हिस्स्यावरून तिघांत भांडण सुरू आहे. सर्वत्र सावळागोंधळ सुरू आहे. मंत्रिमंडळाचे गठण लवकर करून काम झपाट्याने सुरू झाले पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले. ईव्हीएम रॅलीच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, लोकांचा विश्वास ईव्हीएमवर राहिलेला नाही. तंत्रज्ञान अॅडव्हांस झालं. पण त्याचा दुरूपयोग होताना दिसतो आहे. निवडणूक हा लोकांचा विश्वास आहे. देशाच्या भविष्यासाठी मतदान झालं पाहिजे. पण आता मतदान पारदर्शकपणे होत नाही.
Sudhir Mungantiwar : दुर्लक्षित विभागांत ‘जान’ फुंकणारे कर्तव्यतत्पर नेते
सर्वोच्च न्यायालयाच्या नायाधीशांनी याचिका फेटाळताना जी टीपणी केली, त्याला राजकीय स्वरूप दिसत आहे. म्हणून लोकशाही आहे का, हा प्रश्न पडतो आहे. विरोधक संपल्यास काय होईल हाही प्रश्न आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मी काही बोलणार नाही. अजित पवार असो की एकनाथ शिंदे त्यांना आता जे दिलं ते घ्यावं लागणार आहे. पटत असेल तर घ्या नाही तर घरी आराम करा, अशीच काहीशी त्यांची स्थिती झाल्याचे दिसते आहे. आता हे दोघे बार्गेनिंग करू शकत नाहीत. ‘धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतय’, अशी दोघांची स्थिती झाली असल्याचे सांगत वडेट्टीवारांनी शिदे आणि पवारांची फिरकी घेतली.